पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जून अखेरपर्यंत पुण्यात पाणी कपात नाही - गिरीश बापट

गिरीश बापट

पुण्यामध्ये जून अखेरपर्यंत पाणी पुरवठ्यात कपात करण्यात येणार नसल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात पाण्याचा साठा किती आहे, याचा दर १० दिवसांनी आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

गिरीश बापट म्हणाले, मे आणि जून या दोन महिन्यांला पुण्यासाठी पुरेल इतका साठा खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये शिल्लक आहे. त्याचबरोबर जूनमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत पुण्यात पाणी कपात करण्याची गरज नाही. दर दहा दिवसांनी धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो आहे. पुढील काळात गरज पडल्यास त्यावेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट, धरणात कमी साठा

गिरीश बापट यांनी शुक्रवारीच महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेत घेतली. गेल्या वर्षी याचवेळी खडकवासला प्रकल्पामध्ये ८ टीएमसी पाणी शिल्लक होते. यावेळी केवळ ६ टीएमसी पाणी शिल्लक आहे. 

महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. किमान अर्धा टीएमसी पाणी हे आषाढी वारीतील पालख्यांसाठी राखून ठेवावे लागते. त्याचबरोबर अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल. त्यामुळे उर्वरित पाणीच वापरता येईल. 

पुण्यात पाणीटंचाई, अनेक भागात टॅंकरने पुरवठा

पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पाणी कपातीचे वेळापत्रक तयार केले होते. पण या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी आणि गिरीश बापट यांच्यावर जोरदार टीका केली होती.