पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चौकशीची भीती दाखवून नेत्यांना धमकावलं जातंय, शरद पवारांचा सरकारवर आरोप

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर घणाघात केला आहे. सत्ताधारी चौकशीची भीती दाखवून नेत्यांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे. ईडी, सीबीआयचा वापर करत लोकप्रतिनिधींना धमकावले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी वास्तव, अवास्तव चर्चा केली जात आहे. कारखाने, बँकां तसेच काहींना वैयक्तिक खटल्यांची भीती दाखवून पक्षात घेतले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ते पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतरात वाढ होत असते असेही त्यांनी यावेळी म्हटले.

आमदार फोडण्यासाठी सत्तेचा गैरवापर सुरु : शरद पवार

शरद पवार म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी यंत्रणेच्या माध्यमातून धमकावणे सुरु केले आहे. यासाठी ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. चित्रा वाघ यांना त्यांच्या पतीविरोधात सुरु असलेल्या एसीबीच्या दोन खटल्यांची धमकी देण्यात आली. अखेर त्यांनी आपल्याला हे सहन होण्यापलिकडचे आहे, असे सांगत मला पक्ष सोडण्याची परवानगी द्या अशी मागणी केली. दुसरीकडे माजी मंत्री कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना भाजपत येण्यास सांगितले. पण त्यांनी नकार दिल्यानंतर लगेचच त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीचे छापे टाकण्यात आले. या छाप्यात काहीच आढळून आले नसल्याचे वृत्तपत्रात आले आहे. हा सत्तेचा टोकाचा गैरवापर सुरु आहे. 

पंढरपूरचे काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांना तर कारखान्याच्या बदल्यात पक्षांतराची अट घालण्यात आली. त्यांच्या कारखान्याला नियमबाह्य आर्थिक मदत करण्यात आली. अखेर संस्था टिकवण्यासाठी त्यांना भाजपत जावे लागले.

'चौकशीचा ससेमिरा, कारखान्यांची थकित ऊसबिले यामुळे नेत्यांचे पक्षांतर' 

छगन भुजबळांविरोधातही सूडबुद्धीने वागण्यात आले. त्यांच्याविरोधात खटले दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्यावर आरोप काय होता ? त्यांनी एका बिल्डरला टी़डीआर वाढवून देऊन त्याबदल्यात दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधून घेतला. यासाठी सरकारला एक नवा पैसाही खर्च करावा लागला नाही. ही वास्तू अत्यंत सुंदर झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही महत्वाच्या बैठकांसाठी महाराष्ट्र सदनाला प्राधान्य देतात. पण त्यांनी भुजबळांविरोधात मोर्चाच उघडला आहे. 

राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपत दाखल होत असल्याच्या निव्वळ चर्चा रंगल्या आहेत. पण त्या केवळ चर्चा आहेत. शिवेंद्रसिंह राजे यांनी शनिवारी आपली भेट घेतली. त्यांनी त्यांच्या काही अडचणी सांगितल्या. तब्बल दीड तास ते माझ्यासोबत होते. त्यांनी पक्षाच्या चौकटीबाहेर आपण नसल्याचे म्हटले आहे. राहुल जगताप, संग्राम जगताप यांनी फोन करुन आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचे म्हटले. तर बार्शीचे दिलीप सोपल हेही शनिवारी आपल्याबरोबर होते, अशी माहितीही त्यांनी दिली. 

निवडणुकांसाठी आम्हाला यात्रा काढायची गरज नाही, प्रकाश आंबेडकरांचा टोला

यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार असून लवकरच जागा वाटपही होईल, अशी माहिती दिली.

विद्यमान जागा ठेवणे हाच आघाडीचा धर्म 


काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेला आम्ही आघाडीचा धर्म पाळला आता विधानसभेला राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळावा अशी भूमिका मांडली आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, आम्ही आघाडीचा धर्म पाळतच आहोत. यात ज्याच्या विद्यमान जागा आहेत या जागा त्या त्या पक्षाला तशाच ठेवायच्या असतात आणि त्यातील काही जागा इकडे तिकडे होऊ शकतात. कोणती जागा सुटणार कोणती नाही ते दोन्ही पक्षचे नेते ठरवतील असे त्यांनी सांगितले.