पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनिया गांधी-शरद पवार यांच्यातील बैठक ठरली! तिढा सुटणार की...

सोनिया गांधी आणि शरद पवार

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात सोमवारी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या दोन पक्षश्रेष्ठींच्यातील चर्चेनंतर राज्यातील सत्तास्थापनेची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे गट नेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. 

पुन्हा भाजप-सेनेचे सरकारच येईल, आठवलेंना अजूनही आस

नवाब मलिक म्हणाले की, कोअर कमिटीच्या बैठकीत सध्याच्या घडीच्या राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच अन्य महत्त्वपूर्ण मुद्यावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणून लवकरात लवकर राज्यात पर्यायी सरकार निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत निवडणूक लढवली आहे. त्यामुळे यासंदर्भातील पुढील निर्णय काँग्रेससोबत चर्चा करुनच घेतला जाईल. सोमवारी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील चर्चेनंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आम्ही मेगा भरती करणार नाही, जे होईल ते 'मेरिट'वरच : जयंत पाटील

उल्लेखनिय आहे की, राज्यातील निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर यापूर्वी देखील शरद पवारांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. राज्यातील एकूण परिस्थितीचा आढाव्यासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा करण्यात आली होती. याचवेळी आवश्यकता पडल्यात पुन्हा सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचे शरद पवारांनी म्हटले होते. त्यानुसार शरद पवार दुसऱ्यांदा त्यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भातील घडामोडींच्या दृष्टिने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीनंतर तरी राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटणार की बैठकींचा सिलसिला असाच सुरु राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.