पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेकरांनो शक्यतो घराबाहेर पडू नका, अनेक रस्ते बंद आहेत!

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणीच-पाणी

पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले आहे. पुण्यातील जोरदार पावसाने शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा आणि पवना या नद्या प्रवाहा बाहेर वाहत असून अनेक नागरिक घराबाहेर पडून पाणी पाहण्यासाठी शहरातील पुलांवर गर्दी करत आहेत. परिणामी पावसामुळे विस्कळीत झालेल्या वाहतूक कोंडीच आणखी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील पुलांवर नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहन केले आहे.    

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन, अग्नीशामक विभाग सज्ज आहे. पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता शहरात एनडीआरएफची एक टीम देखील तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यश आले आहे. पुणे शहरात आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणात झपाट्याने वाढ झाली असून खडकवासला धरणातून ४५ हजार ४२४ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने नदी पात्रालगत असलेल्या पाटील इस्टेट, मंगळवार पेठ, विश्रांतवाडी शांतीनगर वसाहतीमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या असून यातील जवळपास एक हजार बाधित कुटुंबांना अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळा, समाज मंदिर अशा सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. शहराला जोडणार्‍या अनेक पुलांवरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.

या मार्गावरुन वाहतूक बंद

विद्यापीठ ते वाकड पूल दरम्यानची वाहतूक बंद आहे. पाणी पुलावरुन वाहत असल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. 
-औंध ते वाकड पूल वाहतूक देखील बंद 
 -विशाल नगर ते वाकड रोड पूर्णत: बंद करण्यात आला आहे.-हिंजवडी येथील नवीन पूल बंद 
-ज्यूपिट ग्राउंडचा दुसरा मजला पाण्याखाली 
-औंध सांगवी पूल बंद 
-कासापेठ वस्ती, मानकर चौकातील रस्ता ३-४ फूट पाण्याखाली   

खडकवासला धरणातून वेगाने पाणी विसर्ग करण्यात येत असल्यामुळे मुठा नदी पात्राबाहेर गेली आहे. बालेवाडी, बाणेर, औंध, येरवडा, सिंहगड रोड आणि बोपोडी या परिसराला जोडणारे काही पूल पाण्याखाली गेले आहेत. खुडे, संभाजी, महर्षी शिंदे, बाबा भिडे आणि संगमवाडी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.  

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:monsoon 2019 There are cracks that have appeared on the new river bridge to Hinjewadi and hence the bridge is closed Pune Banglore highway may be shut down as well