पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात पुन्हा मुसळधार, सिंहगड रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी अन् एकाचा मृत्यू

पुण्यात पुन्हा मूसळधार

मुसळधार पावसाने पुणे शहराला पुन्हा एकदा झोडपून काढले. बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले. शहरात रात्री साडे आठ वाजेपर्यत २०.९ मिमी पावसाची नोंद झाली. 

दिवसभरातील ढगाळ वातावरणानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडांटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका प्रचंड होता की तासाभराच्या पावसाने शहर ठप्प झाले. शहरात बुधवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांत शिवाजीनगर येथे १०.२ मिमी, पाषाण येथे ५०.३ मिमी, खडकवासला येथे २० मिमी आणि लोहगाव येथे ६३ मिमी पावसाची नोंद झाली. 

चार तासांपेक्षा अधिक वेळ वाहतूक ठप्प

सिंहगड रोडवर मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यत दांडेकर पूलापासून ते राजाराम पुलापर्यत साडेचार तास लोक वाहतूक कोंडीमध्ये अडकले होते. लकडी पूलापासून ते दांडेकर पूलापर्यत लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर लोक अडकले होते. स्वारगेट चौकापर्यत टिळक रोडवरही अशीच अवस्था होती. सहकारनगर परिसरात रस्त्यावरील दुचाकी पाण्यात गेल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच पुराचा तडाखा अनुभवलेल्या नागरीकांची पावसाने पुन्हा वाताहत झाली.

टिळक रोड, स्वारगेट चौक, सातारा रोडवरील सिटीप्राईड  थिएटर चौक या परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. सारसबागेजवळ झाड पडल्याने मित्र मंडळ चौकामध्ये कोंडी झाली होती. सिंहगड रोडवरील भा. द खेर चौकामध्ये ड्रेनजमधून बाहेर पाणी पडत असल्याने या ठिकाणी रस्ता गुडघाभर पाण्यात गेला होता. म्हात्रे पुलानजीकच्या रिलायन्स मॉलजवळ गुडघ्याइतके पाणी साचल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरु होती. त्यामुळे वाहनांच्या सुमारे एक किलोमीटरपर्यत रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. शहरावर जास्त घनतेचे ढग जमा झाल्यामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असून शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

वस्त्यांमध्ये शिरले पाणी
सहकारनगर, आंबिल ओढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, राजेंद्रनगर, पर्वती पायथा या ठिकाणी असलेल्या वस्त्या आणि झोपडपट्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. सायंकाळी आंबिल ओढयामध्ये पाणी वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविले. 

५० पेक्षा अधिक ठिकाणी झाडे पडली 
सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या ५० पेक्षा अधिक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. कोथरुड, एरंडवणे येथील दिनानथ मंगेशकर रुग्णालयाजवळ झाड कोसळले. सारसबागेजवळ झाड पडल्याने स्वारगेट, मित्र मंउळ चौक या परिसरात मोठी कोंडी झाली होती. आनंदनगर येथील चिंचणीकर रुग्णालयाजवळ झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती. या भागात सुमारे एक ते दिड पूâट पाणी रस्त्यावर तुंबले होते.  उत्तमनगर, बावधन, वारजे, कर्वेनगर, कोथरुडमधील थोरात उद्यान, शास्त्रीनगनर आदी पन्नासहून अधिक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. 

PMPML बसवर झाड कोसळून चालकाचा मृत्यू

बंद पडलेली पीएमपी बस घेऊन जाण्यासाठी आलेल्या 'पीएम सर्व्हिस व्हॅन' वर महाकाय वडाचे झाड कोसळून एका चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झालेला असताना टिळक रस्त्यावर पीएमपी बस बंद पडल्याची माहिती सर्व्हिस सेंटरला मिळाली होती. स्वारगेटवरून ही बस टिळक रस्त्यावरून जात होती. ही बस स. प. महाविद्यालय चौकात आल्यावर मुसळधार पाऊस व प्रचंड वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे मोठे झाड बसवर पडले.