राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाचा फार्म्युला ठरला. भाजप-शिवसेना यांच्यात युतीबाबत तर्कवितर्क सुरु असताना काँग्रेस राष्ट्रवादीत समजूतदारपणाचे एक चित्र पाहायला मिळाले. मात्र कोणत्या जागेवर कोणी लढावे याबाबत आघाडीतही कळीचा मुद्दा निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुण्यातील कार्यकारी मेळाव्यात अजित पवार यांनी पुणे मतदारसंघातील पर्वती, हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला हे चार मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याचे सांगितले. कसबा, शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट या तीन मतदारसंघात काँग्रेस तर कोथरुडची जागा मित्र पक्षांना सोडण्यात आली आहे, अशी घोषणाच त्यांनी केली. मात्र पुण्यातील पर्वती मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस अजूनही आग्रही आहे.
BLOG : पर्वती मतदारसंघाची अशीही ओळख
काँग्रेस पक्षाचे नेते आणि पुणे महानगरपालिकेचे सदस्य अबा बागूल पर्वती मतदार संघातून लढण्यासाठी उत्सुक आहेत. मागील दोन वर्षांपासून ते यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. या जागेच्या वाटाघाडीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यात बैठकी देखील झाल्या आहेत. नुकतेच काँग्रेस नेत्यांनी कराडमध्ये जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी पर्वतीची जागाही काँग्रेसला मिळावी, अशी मागणी नेत्यांनी केली.
काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. काँग्रेस पर्वतीच्या जागेसाठी आग्रही आहे. अद्याप याबाबत कोणताही नर्णय झालेला नाही.
अजित पवारांनी स्पष्ट केले पुणे मतदार संघातील आघाडीचे चित्र
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम राष्ट्रवादीकडून पर्वतीच्या मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. भाजपकडून दोनवेळा बाजी मारणाऱ्या आमदार माधूरी मसळ मैदानात असतील. कदम म्हणाल्या की, आम्ही गेल्या काही वर्षांपासून निवडणुक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लावली आहेत, असा दावा करत राष्ट्रवादीलाच जागा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.