पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरे आणि शरद पवार यांची भाषा 'सेम टू सेम'

विनोद तावडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा 'सेम टू सेम' आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करीत आहेत, हे आता वेगळे सांगायची गरज नाही, असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तावडे यांनी सांगितले की, शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या जाहीर सभा झाल्या. पण या जाहीर सभांमधील भाषा मात्र एकच आहे. मोदी सरकार, भाजपची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे, हे शरद पवारही बोलले आणि राज ठाकरे पण नेमके तेच बोलले. तसेच नरेंद्र मोदी हे शहीदांच्या नावावर मते मागतात हेच वाक्य शरद पवारही वापरतात आणि राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात हाच उल्लेख केला. त्यामुळे जनतेलाही आता कळले असेल की, राज ठाकरे कोणाच्या स्क्रीप्टनुसार कसे काम करीत आहेत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.  

राज ठाकरे यांनी भांडूपमधील सभेत रेल्वे अपघातामधील मोनिका मोरे यांना व्यासपीठावर आणले होते, याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, ज्यावेळी त्यांचा अपघात झाला त्यावेळी त्या शिकत होत्या, त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. पण त्यावेळी काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. खासदार किरीट सोमय्या यांनी आर्टिफिशियल ऑरगनच्या माध्यमातून मोनिका मोरे यांना सर्व प्रकारची मदत विविध ट्रस्टमार्फत उपलब्ध करुन दिली. मात्र, काँग्रेसने त्यावेळी काही केले नाही आणि आता उलट राज ठाकरे हाच प्रश्न किरीट सोमय्यांना विचारत आहेत. पण राज ठाकरे यांना काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला का विचारता येत नाही?, असा सवाल तावडे यांनी यावेळी केला.

अभिनंदनची सुटका जिनिव्हा करारामुळे झाल्याचे शरद पवार म्हणत असतील तर मग कुलभूषण जाधव यांची सुटका जिनिव्हा करारामुळे का नाही झाली. अभिनंदन यांची सुटका होण्यासाठी भारताने विशेष प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय दबावही मोदी सरकारने आणल्यामुळे अभिनंदन यांची सुटका झाली. हे पवार का मान्य करत नाही. कुलभूषण यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार नक्की प्रयत्न करते आहे, पण कुलभूषणला पाकिस्तान फाशी देणार होता ते थांबवून आंतराष्ट्रीय कोर्टात आपण ती बाजू भक्कमपणे लढत आहोत, हे मोदी सरकारचेच मोठ यश आहे, हे शरद पवार यांना दिसत नाही का, असा सवालही तावडे यांनी यावेळी केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 language of raj thackeray and sharad pawar is same to same vinod tawde