पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकाल माझ्यासाठी धक्कादायक - पार्थ पवार

पार्थ पवार

फक्त मावळचाच नव्हे, तर देशात सगळीकडेच लागलेले निकाल माझ्यासाठी धक्कादायक होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार यांनी म्हटले आहे. या मतदारसंघात पार्थ पवार यांना पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला. पार्थ पवार हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे यांचे नातू आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या गटाकडून दबाव टाकण्यात आल्यानंतर पक्षाने मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. मतदारसंघातील कार्यकर्त्यांची पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी आहे, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवरच शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. 

घाबरु नका, आत्मविश्वास ठेवा, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना सल्ला

पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणे यांनी २.१६ लाख मतांनी पराभव केला. पार्थ पवार निकालानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, निकाल काहीही येवो. मी आता राजकारणात आलो आहे आणि मावळ मतदारसंघामध्ये काम करीत राहणार आहे. ज्या पद्धतीने देशात निकाल लागले आहेत. ते धक्कादायक आहेत. देशात पुन्हा मोदी लाट आहे, हे आम्हाला जाणवले नाही. काही महिन्यांपूर्वीच विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. पण अचानक त्या सर्व राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपच यशस्वी ठरला.

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

दरम्यान, या निकालाबद्दल श्रीरंग बारणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या कुटुंबातील उमेदवार मतदारसंघात लादण्याचा प्रयत्न केला. पण मतदारांनी तो नाकारला आहे. अजित पवार यांनी पैसा आणि धाकदपटशाहीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी लोकांनी माझ्याशी न्याय केला आहे. या निवडणुकीत मी पार्थ पवारचा पराभव केलेला नाही. तर एकप्रकारे त्यांचे वडील अजित पवार यांनीच त्यांचा पराभव केला. मी २५ वर्षांपासून राजकारणात आहे आणि मतदार माझ्या कामाचा आदर करतात. भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने विजयासाठी खूप मेहनत घेतली. पक्ष यापुढील काळात जी जबाबदारी देईल, ती स्वीकारायला मी तयार आहे.