आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अनुपस्थितीत अनेक बैठका पार पडल्याचा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. याचा अर्थ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे काम समाधानकारक नाही का? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केलाय. जर असे असेल तर मोदींनी अर्थमंत्री सीतारामण यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
मायावतींनी HM अमित शहांचे चॅलेंज स्वीकारलं
पीटीआयच्या वृत्तानुसार चव्हाण म्हणाले की, १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक बोलवण्याची पंरपरा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतीत नियोजन होणे अपेक्षित असते. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालयात अर्थसंकल्पाच्या संदर्भात १३ बैठका पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या एकाही बैठकीत निर्मला सीतारामण यांना बोलवण्यात आले नव्हते. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्र्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर समाधानी नाहीत, असा होता. जर पंतप्रधान अर्थमंत्र्यांच्या कामगिरीवर समाधानी नसतील तर त्यांनी निर्मला सीतारामण यांच्याकडून राजीनामा घ्यायला हवा, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
मनसे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे सूचक ट्विट
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुरुवातीला वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणिन संरक्षण मंत्रालय सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामण यांच्याकडे मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर पूर्णवेळ महिला अर्थमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. सध्याच्या घडीला मोदी सरकारच्या धोरणामुळे देश आर्थिक संकटात सापडल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. अर्थसंकल्प तोंडावर आला असताना थेट अर्थमंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधानांना त्यांची कामगिरी समाधानकारक वाटत नसेल त्यांचा राजीनामा घ्यावा, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर निशाणा साधला आहे.