भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव याने शुक्रवारी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतले. भारताच्या या स्टार क्रिकेटरने आरती करत आई-वडिलांच्या तंदुरुस्तीसाठी बाप्पाकडे प्रार्थना केली. याशिवाय भारतीय संघाच्या यशाबद्दल त्याने बाप्पाचे आभारही मानले.
दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केदार म्हणाला की, दगडूशेठ हलवाई पुण्यातीलं प्रसिद्ध दैवत आहे. आतापर्यंत बाप्पानं मला खूप काही दिलय. यावेळी त्याच्याकडे काही न मागता त्याचे आभार मानायला आलोय. २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या केदार जाधवने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले होते. इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगलेल्या विश्वचषकाच्या १५ सदस्यीय संघात निवड झालेला केदार जाधव हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा आणि पुण्याचा पहिला खेळाडू आहे.