लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने दिलेली सूट पुणे शहर पोलिस आयुक्त परिक्षेत्राला लागू होणार नाही, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहरातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्र सरकारने कोरोनाग्रस्तांची अधिक संख्या असलेल्या भागांना शिथिलतेतून वगळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी शहरातील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असल्याची माहिती दिली आहे.
कोविड -१९: देशात आतापर्यंत २० टक्के रुग्ण कोरोनामुक्त!
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, लॉकडाऊन कालावधीत देशातील ग्रामीण तसेच शहरी भागातील दुकाने चालू ठेवण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या. कोणत्या भागातील आणि कोणती दुकाने नेमकी सुरु राहणार याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमानंतर गृहमंत्रालयाकडून नव्याने आणखी एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत ग्रामीण तसेच शहरी भागातील शिथिलतेमधून कोरोना संक्रमणशील क्षेत्रांना वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मुंबई-पुण्यात १८ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून मुंबई आणि पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. राज्य सरकारने पुण्याचा समावेश हा रेड झोनमध्ये केलाय. परिणामी केंद्राने जारी केलेली शिथलता पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्राला लागू नसल्याचे पुणे शहर पोलिसांनी जाहीर केले आहे. यापूर्वी लागू असलेले निर्बंध कायम राहणार असून कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुणे शहर पोलिस सह आयुक्त रवींद्र शिसवे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.