पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फेसबुकवरून उर्मिला मातोंडकर यांची बदनामी करणाऱ्याविरोधात गुन्हा

उर्मिला मातोंडकर

फेसबुक पोस्टमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. धनंजय कुडतरकर (वय ५७, रा. बुधवार पेठ) असे या व्यक्तीचे नाव आहे. ही पोस्ट लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी म्हणजेच २३ मे रोजी रात्री ९.४९ मिनिटांनी प्रसिद्ध करण्यात आली होती.

आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे, त्यानंतरच त्याला अटक केली जाईल, असे विश्रामबाग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील कलगुटकर यांनी सांगितले. तेच या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

मातोंडकर यांनी मुस्लिम व्यक्तीशी विवाह केल्याच्या मुद्द्यावरून आरोपीने बदनामीकारक मजकूर फेसबुक पोस्टच्या साह्याने प्रसिद्ध केला. उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी काँग्रेसकडून मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. पण त्यांना या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी चार लाख मतांनी पराभूत केले होते. या पराभवानंतरच संबंधित पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती.

या प्रकरणी मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील यांनी तक्रार दाखल केली. आपल्याविरुद्ध तक्रार दाखल झाली असल्याचे कळल्यावर आरोपी पोलिसांना भेटण्यासाठी मंडईतील पोलिस चौकीत आला होता. त्याच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

कुडतरकर यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३५४ (अ)(१)(४) त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ आणि ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगानेही पुण्याच्या पोलिस उपायुक्तांकडून अहवाल मागविला आहे.