पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेऐवजी ठाकरेसेना नाव करा आणि बघा..., उदयनराजे कडाडले

उदयनराजे भोसले

'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकावरून सुरू झालेल्या राजकीय वादामध्ये मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. राजकारण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करू नका, असे सांगतानाच शिवसेनेऐवजी ठाकरे सेना असे नाव करा आणि मग बघा काय होतंय ते, असा शाब्दिक हल्ला उदयनराजे भोसले यांनी चढविला. दादरमधील शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांचे स्थान कुठे आहे आणि ते कुठे असायला पाहिजे, असेही त्यांनी एका फोटोच्या माध्यमातून दाखवून दिले.

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजः उदयनराजे

भाजप कार्यालयात प्रकाशित झालेल्या या पुस्तकानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वंशजांनी या विषयावरून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली होते. त्याला उदयनराजे भोसले यांनी उत्तर दिले. शिवसेनेला महाराजांचे नाव दिले त्यावेळी वंशजांना विचारायला आले होते का, महाशिवआघाडी सरकार स्थापन करताना त्यातून शिव का वगळण्यात आले, असे प्रश्न उदयनराजे यांनी उपस्थित केले. ते म्हणाले, सोयीप्रमाणे शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायचा आणि सोयीप्रमाणे त्यांच्या नावाचा विसर पडू द्यायचा हेच काम सुरू आहे. शिववडा हे नाव कुठून आले. महाराजांच्या नावाचा असा वापर का केला गेला. त्यावेळी आम्ही हरकत घेतली नाही. पण उगाचच आम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही केवळ समाजकारण करण्याचे काम करत आलो आहोत. कधीही राजकारण केले नाही.

'अरे! ये गँग तो बनने से पहले ही टुकडे टुकडे हो गया...'

स्वार्थाने एकत्र आलेले लोक फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते आपापल्या मार्गाने निघून जातात, असे सांगत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. शिवसेनेच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांचे सोडा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार जरी आचरणात आणले तरी खूप झाले. राज्याचा सध्या खेळखंडोबा झाला आहे. हे फक्त माझेच नाही तर राज्यातील सर्वांचेच मत आहे, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.