पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नोकरीच्या अमिषाने तरुणाला गंडा, ४० हजार लांबवले

सायबर गुन्हे (संग्रहित छायाचित्र)

फेसबुकवर आलेल्या एका नोकरीच्या जाहिरातीवरून एका तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीने तरुणाला तब्बल ४० हजार रुपयांना गंडा घातला आहे. सिद्धार्थ रानडे असे या तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील धायरी परिसरात राहतो. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेत व्यवस्थापक पदाची जागा भरायची आहे, अशी जाहिरात सिद्धार्थने फेसबुकवर बघितली. त्यानंतर या ठिकाणी अर्ज केल्यावर समोरच्या अज्ञात व्यक्तीने सुरुवातीला त्याच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. एका खात्यामध्ये २० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. हे पैसे संबंधित खात्यात भरल्यानंतर आरोपीने काही दिवसांनी आणखी २० हजार रुपये भरण्यास सांगितले. नोकरीच्या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी ही रक्कम हवी असल्याचे आरोपीने सांगितले. २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत ही घटना घडली. 

सिद्धार्थने ४० हजार रुपये भरल्यानंतरही त्याला कोणताच प्रतिसाद न मिळाल्यावर त्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पैसे मागण्यासाठी आरोपी ज्या मोबाईलवरून फोन करीत होता. तो क्रमांकही बंद करण्यात आला होता. 

सिद्धार्थने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञान व्यक्तीविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के. टी. पाटील या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.