पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा २०१९: पुणेकरांनो मत देण्यापूर्वी हा अहवाल नक्की वाचा

विधानसभा २०१९: पुणेकरांनो मत देण्यापूर्वी हा अहवाल नक्की वाचा

राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागलेली आहे. विविध पक्षांकडून मुलाखतीचे सोपस्कारही सुरु झालेले आहेत. या धांदलीतच निवडणुकीच्या तोंडावर नेहमीच होणाऱ्या पक्षांतराचीही घाई सुरु आहे. येत्या काही दिवसांत राज्यात आचारसंहिताही लागू होईल. त्यामुळे प्रत्येकजण तिकीटासाठी जोमाने तयारी करताना दिसतोय. विद्यमान आमदारांसह माजी आमदार त्याचबरोबर पहिल्यांदा निवडणूक लढवण्यासाठीही अनेकजण इच्छुक आहेत. या भाऊगर्दीत आपल्या मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराने विधानसभेत मतदारसंघासाठी आणि राज्याच्या धोरणात्मक निर्णयांत काय कामगिरी केली, जाणून घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यासाठी मुंबईतील संपर्क संस्थेने वर्ष २०१४ ते २०१८ या काळातल्या सर्व २८८ आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा सामजिक अंगाने अभ्यास केला आहे. आजच्या भागात पुणे जिल्ह्यातील आमदारांच्या मागील चार वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्या आमदाराने किती आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले. त्यांची उपस्थिती किती होती आदी सर्व बाबींचा या अभ्यासात समावेश आहे. 

शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना रोहित पवार यांचे सडेतोड उत्तर

पुणे जिल्ह्यात एकूण २१ मतदारसंघ असून त्यापैकी २ मतदारंसंघांचे प्रतिनिधित्व महिला आमदार करतात. जिल्ह्यातून एकूण ७२७ प्रश्न विचारले गेले. अभ्यासविषयांत, वरील वर्गवारीत सर्वाधिक ६३ प्रश्न शिक्षणविषयक, त्या खालोखाल ३८ पाणीविषयक, ३१ आरोग्याविषयक, ३० शेतीविषयक, २१ बालकांसंबंधी आणि १० महिलाविषयक आहेत. सर्वात कमी ४ प्रश्न बेरोजगारीविषयक विचारले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी सर्वाधिक ९२ प्रश्न विचारले. त्या खालोखाल कोथरुडच्या भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी ८१ प्रश्न विचारले. या दोघांसह एकूण ८ आमदारांची प्रश्नसंख्या ५० च्या वर आहे. तीन आमदारांची प्रश्नसंख्या एक अंकी आहे. 

सर्वांत कमी प्रश्न इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी विचारले. त्यांनी अवघे तीन प्रश्न विधानसभेत उपस्थित केले. आमदार भरणे यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आता भाजपच्या वाट्यावर असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. 

आमदार मेधा कुलकर्णी यांनी आरोग्यविषयक सर्वाधिक ६ प्रश्न मांडले.  शिक्षणविषयक सर्वाधिक १३ आणि शेतीविषयक सर्वांधिक ८ प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले. शिरुर मतदारसंघाचे भाजपचे आमदार बाबुराव पाचारणे यांनी ७३ प्रश्ने उपस्थित केले होते. गैरव्यवहारविषयक १२२ प्रश्न जिल्ह्यातून उपस्थित केले गेले. त्यात आमदार पाचारणे यांनी सर्वाधिक १९ प्रश्न मांडले. 

अब्दुल्ल सत्तारांच्या हाती भगवा, सिल्लोडमधून उमेदवारीही जाहीर

विधानसभेत सर्वाधिक दिवस उपस्थित राहाणाऱ्यांमध्ये दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभेतील एकमेव आमदार राहुल कुल यांचा समावेश आहे. राहुल कुल यांची विधानसभेतील उपस्थिती ही ९६ टक्के आहे. त्यांनी ५१ प्रश्न मांडले होते. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीस 
उभ्या होत्या. त्यांची राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याबरोबर चुरशीची लढत झाली होती. राज्यात कोणत्याही टोलनाक्यावर नागरिकांना ३ मिनिटांपेक्षा जास्त काळ थांबावे लागल्यास टोल न घेताच सोडण्याचे धोरण लागू करण्याबाबत (२०१६ च्या बजेट अधिवेशनात ४ एप्रिल रोजी विचारलेला तारांकित प्रश्न) त्यांनी प्रश्न मांडला. 

आमदार बाबुराव पाचारणे, मेधा कुलकर्णी, राहुल कुल, चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी धोरणविषयक प्रश्न मांडले.

१३ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल : रावसाहेब दानवे

जगण्याशी निगडीत प्रश्नं कमी


विधानसभा ही राज्यातील धोरणं ठरवणारी महत्वाची संस्था असते. त्यामुळं तेथील घडामोडी खूप महत्वाच्या असतात. तिथं उपस्थित झालेला प्रश्न, त्याचं उत्तर येणं आणि ती सोडवली जाणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे घटनात्मक दृष्ट्या ही अत्यंत महत्वाची अशी संस्था आहे, असे मत संपर्क संस्थेच्या मेधा कुळकर्णी यांनी मांडले. आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी विधिमंडळात काय प्रश्न मांडतो, आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न उपस्थित केले जातात काय याची प्रत्येक नागरिकानं माहिती जाणून घ्यावी. पण दुर्देवानं प्रशासकीय स्वरुपाची प्रश्न विचारले जातात. रोजच्या जगण्याशी निगडीत प्रश्नं कमी आहेत, असेही त्या म्हणाल्या.

वडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपद वंचितकडे असेलः मुख्यमंत्री

पुणे शहरासह जिल्ह्यातील आमदारांची वर्ष २०१४ ते २०१८ या काळातील कामगिरी पुढीलप्रमाणे..


१. अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस, बारामती)- ९२ प्रश्न उपस्थित, ८८ टक्के हजेरी.

२. मेधा कुलकर्णी (भाजप, कोथरुड)- ८१ प्रश्न उपस्थित, ९५ टक्के हजेरी.

३. संग्राम थोपटे (काँग्रेस, भोर)- ७९ प्रश्न, ७३ टक्के हजेरी.

४. बाबुराव पाचारणे (भाजप, शिरुर)- ७३ प्रश्न उपस्थित, ८७ टक्के हजेरी.

५. भीमराव तापकीर (भाजप, खडकवासला)- ७१ प्रश्न उपस्थित, ८८ टक्के हजेरी.

६. सुरेश गोरे (शिवसेना, खेड-आळंदी)- ६३ प्रश्न उपस्थित, ९५ टक्के हजेरी.

७. दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, आंबेगाव)- ६१ प्रश्न उपस्थित, ७८ टक्के हजेरी.

८. राहुल कुल (रासप, दौंड)- ५१ प्रश्न उपस्थित, ९६ टक्के हजेरी.

९. शरद सोनावणे (मनसे (आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश), जुन्नर- ३६ प्रश्न उपस्थित, ९२ टक्के हजेरी.

१०. विजय काळे (भाजप, शिवाजी नगर)- ३३ प्रश्न उपस्थित, ८८ टक्के हजेरी.

११. योगेश टिळेकर (भाजप, हडपसर)- २१ प्रश्न उपस्थित, ७३ टक्के हजेरी.

१२. संजय भेगडे (मंत्रिपदापूर्वीचा कार्यकाळ) (भाजप, मावळ)- १५ प्रश्न उपस्थित.

१३. लक्ष्मण जगताप (भाजप, चिंचवड)- १४ प्रश्न उपस्थित, ७१ टक्के हजेरी.

१४. गौतम चाबुकस्वार (शिवसेना, पिंपरी)- ११ प्रश्न उपस्थित, ९० टक्के हजेरी.

१५. जगदीश मुळीक (भाजप, वडगाव शेरी)- १० प्रश्न उपस्थित, ७७ टक्के हजेरी.

१६. माधुरी मिसाळ (भाजप, पर्वती)- ९ प्रश्न उपस्थित, ७५ टक्के हजेरी.

१७. महेश लांडगे (अपक्ष, भोसरी)- ४ प्रश्न उपस्थित, ८४ टक्के हजेरी.

१८. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)- ३ प्रश्न उपस्थित, ८१ टक्के हजेरी.

१९. विजय शिवतारे (शिवसेना, पुरंदर)- मंत्री असल्याने प्रश्न-उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत.

२०. गिरीश बापट (भाजप, कसबा)- मंत्री असल्याने प्रश्न-उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत.

२१. दिलीप कांबळे (भाजप, पुणे छावणी)- मंत्री असल्याने प्रश्न-उपस्थितीच्या नोंदी लागू नाहीत.