पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपल्यावर हल्ला करणाऱ्यांकडे चाकू, मिरची पावडर, विटा होत्या; एकबोटेंचा दावा

मिलिंद एकबोटे

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना मारहाण करणाऱ्यांकडे चाकू, मिरची पावडर आणि बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंटच्या विटा होत्या, असा दावा खुद्द एकबोटे यांनी केला आहे. मंगळवारी संध्याकाळी सासवडजवळील झेंडेवाडीत मिलिंद एकबोटे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सासवड पोलिस ठाण्यातील एका सूत्राने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, एकबोटेंवर हल्ला करणाऱ्यांपैकी एक आरोपी आणि स्वतः एकबोटे हे पूर्वी एकत्र काम करीत होते. गोरक्षक म्हणून या दोघांची ओळख आहे. पण नंतर काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. एकबोटेंवर हल्ला करणाऱ्या ४० ते ५० जणांपैकी तिघांची ओळख पटली असून, त्यांची नावे पंडीत मोडक, त्याचा मुलगा विवेक मोडक आणि निखिल दरेकर अशी आहेत.  

सासवड येथे मिलिंद एकबोटेंना मारहाण

झेंडेवाडीत मंगळवारी संध्याकाळी सीतारामबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला एकबोटे कीर्तनासाठी आले होते. कार्यक्रमानंतर मारुती मंदिरात एकबोटे प्रसाद घेण्यासाठी बसले असताना मोडक आणि त्यांचे ४० ते ४५ समर्थक आले. त्यांनी एकबोटे व त्यांच्याबरोबरच्या तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, असे एकबोटे यांनी सांगितल्याचे सासवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जगताप यांनी म्हटले आहे. 

पोलिस मोडक पिता-पुत्र त्याचबरोबर दरेकर यांचा शोध घेत आहेत. आपण महिन्याभरापूर्वी मोडक यांच्या संघटनेविरुद्ध एक फेसबुक पोस्ट प्रसिद्ध केली होती, असे एकबोटे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्या पोस्टमध्ये मोडक याच्या गोशाळेतील भ्रष्टाचाराबद्दल लिहिण्यात आले होते. पण ही पोस्ट सध्या फेसबुकवर उपलब्ध नाही. त्यामुळे त्याबद्दल काही सांगता येणार नाही, असे जगताप म्हणाले.