पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी नव्हे, अमित शहांची बारामतीत जाहीर सभा

अमित शहा

पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात यंदा भाजपने जोरदार ताकद लावली आहे. आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली असून, त्यांची लढत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करून दाखवू, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यासाठी पक्षाचे नेते प्रयत्नशील होते. पण आता मोदींऐवजी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची या मतदारसंघात सभा घेण्यात येणार आहे. 

अमित शहा १९ एप्रिलला बारामतीला येत असून, त्यांची जाहीर सभा होणार आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. बारामतीत भाजप नक्कीच विजय मिळवेल, असे अमित शहा यांनी फेब्रुवारीमध्ये म्हटले होते. त्यानंतर या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी पक्षाने मोठे प्रयत्न सुरू केले. कांचन कुल यांना सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवारी दिल्यानेही या मतदारसंघाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

बारामतीत नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यासाठी भाजपचे राज्यातील नेते आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते. पण सध्याच्या व्यग्र दिनक्रमात बारामतीत सभा घेणे मोदींना शक्य होणार नाही. त्यामुळेच अमित शहा यांची सभा घेण्यात येणार आहे. 

दरम्यान, मोदी यांनी बारामतीत सभा न घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळेच मोदींनी या मतदारसंघात सभा घेतली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार यांचेच बोट धरून मी राजकारणात आलो, असे नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये म्हटले होते. आता शरद पवार यांचीच मुलगी बारामतीमधून निवडणूक लढवित असल्यामुळे तिथेच प्रचारसभा कशी घ्यायची, असे वाटल्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी येथे सभा घेणे टाळले, अशी चर्चा आहे.