पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात ६१ टक्के करदाते ऑनलाईन कर भरतात

पुणे महापालिका इमारत

पुण्यातील ६१ टक्के महापालिका करदाते त्यांचा मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीनेच भरतात, अशी माहिती पुढे आली आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास ५ ते १० टक्क्यांची सवलत दिली जाते. त्याचा फायदा घेण्यासाठी नियमित करदाते ऑनलाईन पद्धतीने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर भरतात. 

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०१९ पूर्वी महापालिकेचा कर भरणाऱ्यांना ५ ते १० टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. २७ एप्रिलपर्यंत महापालिकेने मालमत्ता कराच्या माध्यमातून २२० कोटी रुपयांचे उत्पन्न कमाविले. ३१ मे २०१९ पर्यंत महापालिका ७०० कोटी रुपये कमाविण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी ही माहिती दिली. 

जे करदाते वर्षाला २५ हजार रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर भरतात, त्यांना १० टक्के तर २५ हजार रुपयांपेक्षा कमी मालमत्ता कर भरणाऱ्यांना पाच टक्के सवलत देण्यात येते. कानडे म्हणाले, लवकर कर भरणाऱ्यांना त्यामध्ये काही टक्क्यांची सवलत देण्याच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ६१ टक्के लोकांनी त्यांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात संपूर्ण कर जमा केला तरच महापालिका संबंधित करदात्याला ही सवलत देते. शहरात विविध पायाभूत सोयीसुविधांची कामे करण्यासाठी या पैशाचा उपयोग होत असतो.