पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक!, देशात यंदा मान्सून पूर्व पावसात २९ टक्के घट

मान्सून पूर्व पाऊस

देशात मान्सूनच्या आगमनास २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यंदा एक मार्च ते एक मे या कालावधीत देशात मान्सून पूर्व पावसाच्या टक्केवारीत घट झाली आहे. या काळात मान्सून पूर्व पाऊस सरासरीपेक्षा २९ टक्क्याने कमी झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. देशात या कालावधीत एकूण ५०.७ टक्के मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. साधारणपणे या काळात देशात सरासरी ७१ मिलिमीटर पाऊस पडतो. 

पश्चिम गुजरात, अरुणाचल प्रदेश, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा आणि केरळ या ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस सर्वात कमी पडला आहे. 

मान्सून यंदा महाराष्ट्रावर नाराज राहण्याचा अंदाज

महाराष्ट्राचा विचार केल्यास कोकणात आणि गोव्यात मान्सनपूर्व पावसाच्या सरी सर्वात कमी पडल्या आहेत. त्यामुळे येथील घट ही ८७ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. जी राज्यात सर्वाधिक आहे. त्या खालोखाल विदर्भात मान्सून पूर्व पावसाची घट ६८ टक्के इतकी आहे. पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले, यावेळी मान्सून पूर्व पावसासाठी काहीसे पोषक वातावरण असतानाही पुरेसा पाऊस पडला नाही. त्याचबरोबर कमी दाबाचा पट्टाही अपेक्षेप्रमाणे तयार न झाल्यामुळे त्याचाही मान्सून पूर्व पावसावर परिणाम झाला. 

दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस कमी झाल्यामुळे राज्यातील दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार आहे, असे दुसऱ्या महाराष्ट्र सिंचन आयोगाचे सचिव डी. एम. मोरे यांनी सांगितले. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये याची तीव्रता जाणवेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गेल्यावर्षीही पाऊस कमी पडल्यामुळे खरीप आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. फुलशेती करणारे आणि भाजीपाल्याचे पिक घेणारे अनेक शेतकरी मान्सून पूर्व पावसावर अवलंबून असतात, असे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र, धरणे कोरडी

यंदा मान्सूनपूर्व पाऊस कमी का झाला, याचे ठराविक असे काही कारण नसल्याचे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी सांगितले. मान्सून पूर्व पावसामध्ये इतक्या प्रमाणात घट होणे नैसर्गिक असू शकते. आता मान्सूनची वाट बघावी लागेल, असेही ते म्हणाले.