लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना त्यांची संपत्ती जाहीर करावी लागते. सुप्रिया सुळे यांनी निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत ३० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे एकूण १४३.५९ कोटी रुपयांची संपत्ती आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रातून जाहीर केले आहे. सुळे यांच्यासोबतच काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याकडे ११३.८७ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यात २०१९ मध्ये २९.७२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी एकूण ४.३५ कोटी रुपये सिंगापूरमधील आर्थिक संस्थांमध्ये गुंतवले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक अर्जासोबत प्रत्येक उमेदवाराला गेल्या पाच वर्षातील प्राप्तिकराचे विवरणपत्रही देणे बंधनकारक आहे. त्यामध्ये परदेशातील स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. आपला मुख्य व्यवसाय शेतीच असल्याचे सुप्रिया सुळे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये जाहीर केले आहे. त्याचवेळी आपले पती सदानंद सुळे यांचा व्यवसाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला रेवती आणि विजय अशी दोन मुलं असून, त्यांचीही संपत्ती प्रतिज्ञापत्रामध्ये जाहीर करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी लग्नानंतर काही वर्षे सिंगापूरमध्ये वास्तव्य केले होते. २००६ मध्ये त्यांनी भारतात परतून राज्यसभेची निवडणूक लढविली होती आणि त्या पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या. सुप्रिया सुळे यांच्याकडे एकूण ११८.३३ कोटी रुपयांची स्थावर आणि २५.२६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.