जेजूरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मुक्त हस्ताने भंडार खोलऱ्याची उधळण करून भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले.
उद्या दि. ९ रोजी चैत्र मासारंभ आणि गुडी पाडवा असल्याने भाविकांनी काल रविवारी (दि.७) पासूनच जेजुरीत गर्दी केली होती.
सोमवारी दिवसभर अमावस्येचा पुण्यकाल असल्याने दुपारी १ वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. यानंतर पेशव्यांच्या इशारतीत आणि बंदुकीच्या फैरी झाडत सोहळ्याला सलामी देण्यात आली.
पालखीचे मानकरी खांदेकऱ्यांनी देवाची पालखी उचलली. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारीत नेण्यात आली. देवाच्या सेवेकऱ्यांनी उत्सवमूर्ती पालखीत स्थानापन्न केल्या. आणि निघाला देवाच्या उत्सवमूर्तीचा पालखी सोहळा कहा स्नानासाठी गडकोटाबाहेर पडला. यावेळी देव संस्थान चे मुख्य विश्वस्त, व्यवस्थापक, कर्मचारी उपस्थित होते.
गडकोटाबाहेर सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यानंतर पायरीमार्ग, ऐतिहासिक चिंच बागेतील गौतमेश्वर मंदिर मार्गे जानुबाई चौकातून सोहळ्याने शिवाजी चौक मार्गे कन्हा नदीकडे कूच केले. सायंकाळी ५ वाजता देवाच्या उत्सवमूर्तीचे कन्हा स्नान उरकून सोहळा माघारीचे प्रस्थान ठेवणार आहे.
यापूर्वी गुरव पुजाऱ्यांनी देवाच्या मूर्ती पालखीत आणून ठेवताच शेडा देण्यात आला आणि सोहळ्याला सुरुवात झाली. कऱ्हा स्नान झाल्यानंतर रात्री पालखी सोहळा खंडोबा गडावर दाखल झाला. ‘रोजमारा’ वाटप केल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी मंडळासह पुजारी, सेवेकरी वर्ग, श्री मार्तंड देवसंस्थान तर्फे सोहळ्याचे नियोजन करण्यात आले.
महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाच्या सोमवती अमावस्या उत्सवा निमित्त रविवार (दि.७) पासून तीन लाख भाविकांनी देवदर्शन घेतले ,मराठी महिन्यातील वर्षाचा शेवटचा दिवस आणि सुमारे ५ महिन्यांनी आलेली सोमवारची भर सोमवती त्यामुळे राज्यातील विविध प्रांतातून भाविक भक्त जेजुरीत दाखल झाले होते. यंदाचा राज्यात असलेला दुष्काळ ,पाणीटंचाई,वाढत्या उन्हाळ्या चा झळा,आणि लोकसभा निवडणुकीचे वाहू लागलेले वारे --याचा परिणाम यात्रेवर दिसून येत होता.