महिला प्रीमियर लीगमध्ये बुधवारी (२८ फेब्रुवारी) युपी वॉरियर्सने दमदार कामगिरी केली आणि मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवला. बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर युपीने मोसमातील पहिला विजय मिळवला.
या सामन्यात यूपीची कर्णधार ॲलिसा हेलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईने २० षटकांत ६ बाद १६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपी संघाने १६.३ षटकात १६३ धावा करत सामना जिंकला.
याआधी यूपीला दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, मुंबईला यंदाच्या मोसमात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधी मुंबईने दिल्ली आणि गुजरात जायंट्सविरुद्ध विजय मिळवला होता.
या विजयासह यूपीचे तीन सामन्यांतून २ गुण झाले आहेत. गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर आहेत. यूपी वॉरियर्सचा नेट रन रेट -०.३५७ आहे. दुसरीकडे, मुंबईचे तीन सामन्यांतून ४ गुण आहेत. त्यांचा नेट रन रेट -०.१८२ पर्यंत घसरला आहे.
तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दोन सामन्यांतून ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांचा नेट रनरेट +१.६६५ आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्स दोन सामन्यांत दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचा नेट रनरेट +१.२२२ आहे. गुजरात जायंट्सला दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे शुन्य गुण आहेत.