चित्रपटांच्या बाबतीत तंत्रज्ञान सातत्याने सुधारताना दिसत आहे. एकीकडे चित्रपटसृष्टीने वेगळी उंची गाठली असताना, स्क्रीनिंग तंत्रज्ञानानेही बरीच प्रगती केली आहे. चित्रपट बनवण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात असताना, चित्रपटगृहांमध्येही चित्रपट प्रदर्शनासाठी सातत्याने सुधारणा केली जात आहेत. चला तर, मग जाणून घेऊया जगातील सर्वात मोठी स्क्रीन असलेल्या काही अनोख्या चित्रपटगृहांबद्दल…
स्पेनमधील माद्रिद येथील सिनेपोलिस ऑडिटोरियममध्ये २९ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद पडदा बसवण्यात आला आहे. प्रत्येक दृश्य त्यात प्रचंड वास्तविक दिसत असून, या थिएटरची क्षमता ९९६ लोकांची आहे.
अमेरिकेतील लास वेगासमध्ये १ लाख ६० हजार स्क्वेअर फूट आकाराच्या एका गोलाकार इमारतीला १६ के एलईडी लाईट्सने पूर्णपणे झाकून एक मोठी स्क्रीन तयार करण्यात आली आहे. आतमध्येही गोलाकार स्क्रीन बनवण्यात आली असून १८ हजार आसनक्षमता असलेल्या या थिएटरमध्ये पडद्यावरील सर्व काही अगदी जिवंत भासू लागते. आपण देखील या चित्रपटातच आहोत, असे वाटू लागते.
मेलबर्न आयमॅक्स हे ऑस्ट्रेलियामधील ३२ मीटर रुंद आणि २३ मीटर लांब पडद्यासह ४६१ आसनक्षमता असलेले थिएटर आहे. आयमॅक्सचे उच्च दर्जाचे ध्वनी तंत्रज्ञान या ऑडीमध्ये चित्रपट पाहण्याचा अनुभव अतिशय खास बनवते.
जर्मनीतील लिओनबर्ग येथे असलेल्या ट्रंपलास्ट मल्टीप्लेक्समध्ये ३८ मीटर रुंद आणि २२ मीटर उंच पडदा बसवण्यात आला आहे. ५७४ आसन क्षमता असलेले हे जगातील सर्वात मोठे आयमॅक्स थिएटर आहे.
जर, तुम्हाला चित्रपट पाहण्याची आवड असेल तर दक्षिण कोरियातील सोल येथील सीजीव्ही स्टारियम ऑडिटोरियम अजिबात चुकवू नका. या ऑडीमध्ये ६०२ लोक एकत्र चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात आणि जगातील सर्वात मोठी स्क्रीन असलेल्या चित्रपटगृहांमध्ये याची गणना होते.
सोल, दक्षिण कोरिया येथे स्थित लॉते सिनेमा वर्ल्ड तुम्हाला चित्रपट पाहण्याचा अप्रतिम अनुभव देऊ शकते. या ऑडीची आसन क्षमता ६२२ आहे. हे चित्रपटगृह जगभरात सुपर प्लेक्स जी स्क्रीनसाठी ओळखली जाते.
पूर्वी लोक सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जाऊन अतिशय अवघड आसनांवर बसून तीन तासांचा चित्रपट पाहत असत, तिथे आता अशी सभागृहे बांधली जात आहेत, ज्यात बसण्याच्या सोयीपासून ते दृश्य गुणवत्ता आणि स्क्रीनवरील आवाज या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. न्यू यॉर्क, यूएसए मधील लिंकन स्क्वेअर, आयमॅक्स थिएटरमध्ये चित्रपट पाहताना प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळतो, ज्यामुळे प्रत्येक दृश्य वास्तविक वाटू लागते.