‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अरुंधती’ म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर-गोखले हिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. या मालिकेत सध्या एक अतिशय वेगळं वातावरण पाहायला मिळत आहे. या मालिकेमध्ये आता अरुंधती एका कुकिंग स्पर्धेत भाग घेतला आहे. यामध्ये ती अपघात होऊन देखील आपली कला दाखवताना दिसत आहे. या दरम्यानच ‘अरुंधती’ म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने तिला स्वयंपाकाची कला कुणी शिकवली, याचा खुलासा केला आहे.
सध्या मालिकेत अरुंधती एका कुकिंग स्पर्धेत भाग घेऊन चमचमीत पदार्थ बनवताना दिसत आहे. तर, खऱ्या आयुष्यात देखील मधुराणी सुगरण आहे. ते अतिशय उत्तम स्वयंपाक बनवते. तिलाही स्वयंपाकाची कला कुणी शिकवली, याबद्दल नुकताच अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
प्रत्येक मुलीला अगदी लहानपणापासूनच जेवण बनवण्याची आवड असते. तर, स्वयंपाकाचे प्राथमिक धडे तिला आईकडूनच मिळतात. मात्र, मधुराणीला स्वयंपाकाची कला शिकवणारी व्यक्ती तिची आई नव्हती. मधुराणीला उत्तम स्वयंपाक बनवण्याची कला तिच्या सासर्यांनी शिकवली आहे. याचा खुलासा नुकताच अभिनेत्रीने केला आहे. अरुंधती म्हणाली की, ‘मी माझ्या आई समोर कधीच कुठला पदार्थ शिकायला उभी राहिली नाही. मला सगळा स्वयंपाक माझ्या सासर्यांनी शिकवला आहे.
मधुराणी म्हणाली, ‘सासुबाई गेल्यानंतर सासऱ्यांनी तूप कडवण्यापासून सगळ्या गोष्टी स्वतः शिकून घेतल्या. सासूबाई गेल्या त्यावेळी युट्युबवगैरे सारखे प्रकार अस्तित्वातच नव्हते. असले तरी ते फारसे लोकांना माहीत नव्हते. त्या काळात आजूबाजूला जाऊन, तिथल्या महिलांना भेटून, त्यांच्याकडून एकेक रेसिपी लिहून आणून सासरेबुवा स्वयंपाक करायचे आणि लग्न झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत स्वयंपाक घरात उभी राहून स्वयंपाक शिकले.’
मधुराणी म्हणाली की, ‘मी माझ्या अभ्यासात कॉलेजमध्ये आणि इतर गोष्टी करण्यात इतकी व्यस्त होते की, आईकडून स्वयंपाक शिकायचा राहून गेला. तिने मला कधी असं म्हटलं नाही की, स्वयंपाक शिकून घे, स्वयंपाक आला पाहिजे. पण, तिला माहीत होतं की, वेळ पडल्यावर मी नक्की शिकेन. माझ्या बाबतीत मात्र आता काहीसं उलटच घडत आहे. माझ्यापेक्षा स्वयंपाकाची जास्त आवड माझ्या मुलीला आहे आणि इतक्या लहान वयातच खूप उत्तम पदार्थ बनवत असते.'