बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निघृण खून करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडवली आहे. ९ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास संतोष देशमुख यांना त्यांच्या चुलत भावासोबत कारमधून जात असताना, एका स्कॉर्पिओ गाडीतील सहा जणांनी अडवून जबरदस्तीने पळवून नेले. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला. देशमुख यांच्या मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा असल्याने प्रकरण आणखी गंभीर बनले. या प्रकरणात दोन आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक करण्यात आली असली तरी प्रमुख सूत्रधार अद्याप फरार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव चर्चेत आले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तर, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही याप्रकरणावरुन थेट वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे, वाल्मिक कराड कोण आहेत, याची चर्चा राज्यभर सुरू आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले आहेत. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण विधिमंडळात उचलून धरले, व या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा त्यांनी म्हटलं आहे. तसेच गावकऱ्यांनी देखील वाल्मीक कराडवर मुख्य आरोपी असल्याचा संशय गावकऱ्यांनी वर्तवला आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. या प्रकरणी एका पीएसआयला सस्पेंड करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून या प्रकरणाचा शोध घेतला जात असल्याचे फडणवीस म्हणाले.
वाल्मीक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत.
धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मीक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
धनंजय मुंडेंचे राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावलीसारखे त्यांच्यासोबत आहेत. जिल्ह्यातील सरकारी, सामाजिक सर्व कार्यक्रम कराड बघतात. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे ते जिल्हा चालवायचे. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांचा दरारा होता.
वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. कराड यांचे अनेक नेत्यांसोबत छायाचित्रे आहेत, ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे.
धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे नाव अनेकदा वादग्रस्त प्रकरणांशी जोडले जात आहे. विष्णु चाटे, जो संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी मानला जातो, त्याच्यावर केज तालुक्यात गंभीर आरोप आहेत आणि तो धनंजय मुंडे व कराड यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.
धनंजय मुंडे यांनीही अधिवेशनादरम्यान कराड हे त्यांचे निकटवर्तीय असल्याची कबुली दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.