बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती ही अशा अभिनेत्रींपैकी एक होती ज्यांनी फार कमी वेळात प्रसिद्धी मिळवली. दिव्या अवघ्या काही वर्षांतच बॉलिवूडची टॉप अभिनेत्री बनली. तिने अभिनय केलेला प्रत्येक चित्रपट हिट झाला. तिचे चित्रपट पाहण्यासाठी लोक वेडे व्हायचे. पण कदाचित तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच होतं.
वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी दिव्याने हे जग सोडले. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड हादरून गेले होते. अनेकांनी याला हत्या देखील म्हटले. तर, काहींनी वेगवेगळे कयास बांधले. आतापर्यंत दिव्याचा मृत्यू हे न उलगडलेले गूढच आहे.
९० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि दिव्या भारतीची खास मैत्रिण आयशा जुल्का हिने एकदा एका मुलाखतीत अभिनेत्रीबद्दल एक धक्कादायक खुलासा केला होता. आयशाने सांगितले की, दिव्याला तिच्या मृत्यूची आधीच चाहूल लागली होती.
आयशा जुल्काने बीबीसीशी बोलताना सांगितले होते की, दिव्याच्या मृत्यूची बातमी कळताच तिचा विश्वास बसत नव्हता. या बातमीने ती सुन्न झाली होती आणि तिचा बराच वेळ विश्वास बसत नव्हता.
आयशा जुल्काने असेही सांगितले की, दिव्याबद्दल आणखी एक विचित्र गोष्ट होती. मला सत्य माहित नाही, परंतु कदाचित तिला स्वतःबद्दल काहीतरी माहित होते. म्हणूनच ती नेहमी म्हणायची, 'घाई करायला हवी, गोष्टी लवकर करायला हव्यात. आयुष्य खूप लहान आहे.’
आयशाने असेही सांगितले होते की, 'दिव्याने तिला कधीच स्पष्टपणे सांगितले नाही, परंतु कधीकधी एखाद्या व्यक्तीला कळते की, आपले काय होणार आहे. कदाचित म्हणूनच तिला सर्व काही खूप लवकर करायचे होते. अनेकवेळा तिच्या बोलण्यातून असं वाटत होतं की, ती आपल्यासोबत जास्त दिवस राहणार नाही, हे तिला माहीत होतं.
दिव्या भारतीच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती. दिव्याच्या निधनाने तिचे चाहते आणि स्टार्सना प्रचंड धक्का बसला होता.