स्व रेल म्हणजे काय?
रेल्वे मंत्रालयाने 'स्व रेल' हे सुपर अॅप सादर केले आहे, जे सर्वसामान्यांना सर्वसमावेशक रेल्वे सेवा प्रदान करणारे एक-स्टॉप सोल्यूशन मानलं जात आहे. या अॅपची सध्या बीटा चाचणी सुरू आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून देखील डाउनलोड करता येणार आहे.
प्रवाशांना मिळणार चांगला UI
या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना चांगला प्लॅटफॉर्म मिळणार आहे. वापरकर्ता इंटरफेस (UI) सह वापरकर्त्यांचा अनुभव सुधारणे हा या अॅपच उद्देश आहे. हे अॅप रेल्वेच्या वेगवेगळ्या सुविधा एकत्र आणते, ज्यामुळे अनेक अॅप्सची आवश्यकता कमी होणार आहे.
या सुविधा मिळणार
या अॅपमध्ये आरक्षित तिकीट बुकिंग, अनारक्षित तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग, पार्सल आणि मालवाहतुकीची चौकशी, ट्रेन आणि पीएनआर स्थिती चौकशी, ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करणे, तक्रार व्यवस्थापनासाठी रेल मदत अशा विविध सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.
एकल साइन-ऑन
वापरकर्ते एकाच त्यांच्या ओळखीच्या पुराव्याचा वापर करून सर्व सेवांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. शिवाय, आयआरसीटीसी रेलकनेक्ट, यूटीएस मोबाईल अॅप इत्यादी विद्यमान भारतीय रेल्वे अॅप्समध्ये देखील हे ओळखपत्र वापरता येणार आहे.
ऑल-इन-वन अॅप
सध्या, आरक्षित आणि अनारक्षित बुकिंगसाठी वेगवेगळे अॅप्स उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, रेल्वे संबंधी माहिती आणि वेळापत्रक तपासण्यासाठी एक स्वतंत्र अॅप आवश्यक आहे. या सर्व सेवा आता एकाच अॅपद्वारे प्रवाशांना मिळणार आहे. तसेच, पीएनआर संबंधित माहिती देखील याच अॅपमध्ये प्रवाशांना मिळणार आहे.
लॉग इन करण्याची सोय
वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी अनेक लॉगिन पर्याय प्रदान करण्यात आले आहेत. एकदा लॉग इन केल्यानंतर, एम-पिन किंवा बायोमेट्रिक वापरून अॅपमध्ये प्रवेश करता येणार आहे.
अॅप कसे वापरावे
CRIS ने दिलेल्या माहितीनुसार, प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून अॅप डाउनलोड करा. यानंतर RailConnect किंवा UTS मोबाईल अॅपचे वापरकर्ते त्यांच्या ओळखीच्या पुराव्यासह अॅपमध्ये थेट लॉग इन करू शकतात. नवीन वापरकर्ते त्यांची नोंदणी करून या अॅपचा वापर करू शकतात.
रेल्वे वॉलेट होणार तयार
सिंगल-साइन-ऑन वैशिष्ट्यामुळे अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज कमी होणार आहे. पहिल्या लॉगिनवर, तिकीट बुकिंग सुलभ करण्यासाठी प्रत्येक वापरकर्त्यासाठी एक आर-वॉलेट तयार केले जाणार आहे. विद्यमान आर-वॉलेट्स मोबाईल अॅपवरील यूटीएसशी आपोआप जोडले जाईल. वापरकर्ते मोबाईल नंबर/ओटीपी द्वारे या अॅपमध्ये अतिथी म्हणून लॉग इन करू शकणार आहेत.