जीबीएस म्हणजे काय?
सीडीसी (सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन) नुसार, हा एक दुर्मिळ आजार आहे, ज्यामुळे मज्जातंतूंना नुकसान होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या नसांना नुकसान पोहोचवते, तेव्हा हा आजार होत असतो.
कोणाला जास्त धोका आहे
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, GBS सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो, परंतु प्रौढ आणि तरुणांमध्ये तो अधिक सामान्य आहे. सीडीसीच्या मते, अमेरिकेत, पुरुषांमध्ये आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जीबीएस आजार सामान्य आहे.
लक्षणे काय आहेत?
सीडीसीच्या मते, जीबीएसच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा आणि हाता पायांना मुंग्या येणे यांचा समावेश आहे. सहसा, जीबीएस ग्रस्त रुग्णांना दोन्ही पायांमध्ये ही लक्षणे जाणवतात. यानंतर, ही लक्षण हात आणि शरीराच्या वरच्या भागात देखील जाणवू शकतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जीबीएसमुळे अचानक शरीरात सुन्नपणा येऊन स्नायू कमकुवत होतात. यासोबतच, या आजारात हात आणि पायांमध्ये तीव्र अशक्तपणा येथे ही सर्व सामान्य लक्षणे दिसतात.
किती प्राणघातक आहे?
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले की, या आजाराचा परिणाम मुले आणि तरुणांवर देखील होऊ शकतो. जीबीएस हा संसर्गजन्य रोग नाही. त्यामुळे त्याचा प्रसार वेगाने होणार नाही. यातील बहुतांश रुग्ण हे पूर्णपणे बरे होतात.
कारण काय आहे?
डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केले की बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गामुळे सामान्यतः जीबीएस होतो. कारण ते रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात. सीडीसीच्या मते, कॅम्पिलोबॅक्टर संसर्ग हे अमेरिकेत जीबीएसचे सर्वात सामान्य कारण आहे. सध्या अधिकारी पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून पाण्याचे नमुने गोळा करत आहेत.
किती घातक आहे आजार ?
जीबीएस ग्रस्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. सीडीसीच्या मते, बहुतेक लोक लक्षणे दिसू लागल्यानंतर २-३ आठवड्यांच्या आत बरे होऊ लागतात. त्याच वेळी, पूर्णपणे बरे होण्यासाठी काही आठवडे किंवा काही वर्षे देखील लागू शकतात. बरे झालेल्या अनेक रुग्णांच्या मज्जातंतूंचे गंभीर नुकसान झाले आहे. त्याच वेळी, काही लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.
उपचार आहेत खूप महाग
जीबीएसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या आयव्हीआयजी इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये असल्याचे वृत्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या ६८ वर्षीय महिलेच्या नातेवाईकाने सांगितले की, तिच्या उपचारात एकूण १३ इंजेक्शन्स वापरली गेली.