देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोन आयडियाचा शेअर आज जवळपास २० टक्क्यांनी गडगडला. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळं गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटाच लावला. काय आहे हा निर्णय?
दूरसंचार विभागानं केलेल्या महसुली (Adjusted Gross Revenue - AGR) थकबाकीच्या मोजणीत त्रुटी असून त्याची फेरगणना करण्यात यावी, अशी याचिका व्होडाफोन आयडियासह काही दूरसंचार कंपन्यांनी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं ती फेटाळून लावली.
व्होडाफोन आयडियाकडं एजीआर/स्पेक्ट्रमशी संबंधित मोठी थकबाकी आहे. आर्थिक वर्ष २०२६ पासून ही द्यायची आहे. मात्र, थकबाकीची रक्कम ठरवताना चुकीची गणना केल्याचा कंपनीचा दावा होता. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठानं गुरुवारी तो फेटाळला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा थेट परिणाम कंपनीच्या शेअरवर झाला. कंपनीचा शेअर आज एनएसईवर तब्बल १९.३८ टक्क्यांनी घसरून १०.४० रुपयांपर्यंत खाली आला. यंदाच्या कॅलेंडर वर्षात हा शेअर आतापर्यंत ३८.५९ टक्क्यांनी घसरला आहे.
ज्यांच्याकडं व्होडाफोन आयडियाचे शेअर्स आहेत, त्यांनी योग्य वेळ बघून शेअरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी दिला आहे. हा शेअर ५.९० ते ५.७० रुपयांपर्यंत खाली जाऊ शकतो, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.