ईशान्येकडील मणिपूर राज्यात एसटी आरक्षणाच्या मुद्दावरून प्रचंड हिंसा आणि जाळपोळ सुरू आहे. येथे बहुसंख्याक मैतेई समाजाला अनुसूचित जमाती (ST)चा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा निषेध म्हणून नागा आणि कुकी या आदिवासी समूहातर्फे ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहे. चूराचांदपुर जिल्ह्याच्या तोरबंग येथे काल, बुधवारी ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित करण्यात आला होता. राज्यात सर्व १० जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोर्चे आणि विरोध प्रदर्शनात हजारो लोकांनी भाग घेतला होता. या मोर्चानंतर प्रचंड हिंसा आणि जाळपोळ सुरू झाली आहे.
मणिपूरची राजधानी इम्फाळ शहरातील एक दृष्य. मैतेई समुहाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या विरोधात ‘ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर’ या संघटनेने राजधानी इम्फाळसह संपूर्ण राज्यभरात मोर्चा काढले होते. यात हजारो लोक सामील झाले होते. मोर्चानंतर उसळलेल्या हिंसेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. काही ठिकाणी दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहे.
(PTI)हिंसेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मणिपूरमध्ये लष्कर आणि आसाम रायफल्सच्या ५५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. परिस्थिती आणखी चिघळल्यास नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराच्या आणखी १४ तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान हिंसाचारग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत. इम्फाळ खोऱ्यातील खुगा, थंपा, खोमाउजंब्बा, लंफेल, कोईरांगी या शहरांमध्ये निमलष्करी दलाच्या जवानांनी आज, गुरुवारी फ्लॅग मार्च केले.
(PTI)ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कॉम ही मूळची मणिपूरची. मणिपूरमध्ये सध्या सुरू असलेली हिंसा आणि जाळपोळीच्या घटनांनी मेरी कॉम प्रचंड व्यथित झाली आहे. माजी राज्यसभा खासदार असलेल्या मेरी कॉमने एक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना हिंसा रोखण्यासाठी तत्काळ पावलं उचलण्याची विनंती केली आहे. ‘मणिपूरमधली परिस्थिती पाहून मला दु:ख होत आहे. पूर्वी मी अशा प्रकारच्या हिंसेची कल्पना सुद्धा केली नव्हती. काल रात्रीपासून येथील परिस्थिती आणखी भयंकर झाली आहे. मणिपूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्थेसाठी राज्य आणि केंद्राने पावलं उचलण्याची मी विनंती करते’ असं ट्विट मेरी कॉमने केलं आहे.