शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ती निवडणूक लढवू शकते. मागच्या वेळी या मतादारसंघातून काँग्रेसचे महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून आलेले बाळू धानोरकर निवडून आले होते. त्यांचा मृत्यू झाल्याने ही जागा रिक्त आहे.
शिवानीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, मागील सात वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे. मी जिल्हा परिषदेच्या माध्यातून राजकीय करिअर सुरू करणार होते. मात्र सरकारकडून लोकशाही संपवण्याचे काम केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेतल्याने संसदेतून आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवानी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची महासचिव आहे. शिवानीने मुंबई विद्यापीठातील मीठीबाई कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे.
२०१९ मध्ये शिवानीने युवक काँग्रेसच्या जिल्हा महासचिवपदाची निवडणूक लढवली होती. २०२० पर्यंत ती राज्य सचिव पदापर्यंत पोहोचली. त्यानंतर तिला राज्य महासचिव पदावर पदोन्नती दिली गेली. ती निवडणूक समितीचे काम सांभाळते.
शिवानी यांनी चंद्रपूर लोकसभेसाठी आपल्या समर्थकांना घेऊन थेट दिल्ली गाठली. मात्र बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यांनी म्हटले की, शिवानी माझी प्रतिस्पर्धक नाही. मी खूप आधीपासून मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. याबाबत पक्षनेत्यांसोबत मुंबईत बैठकही झाली आहे.