'द फॅमिली स्टार' हा चित्रपट मोठ्या अपेक्षा घेऊन ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. साऊथचा राऊडी स्टार' विजय देवरकोंडा आणि ‘सीता रामम’ अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकलेला नाही. तर, थिएटर रिलीजच्या तीन आठवड्यांतच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांचा ‘द फॅमिली स्टार’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे, नुकतीच या ओटीटी प्लॅटफॉर्मने अधिकृतपणे या बातमीची घोषणा केली आहे.
‘द फॅमिली स्टार’ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्राइम व्हिडिओवर तेलुगू आणि तमिळमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट खूप गाजेल अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र, हा चित्रपट अपेक्षेपेक्षा आधीच ओटीटीवर झळकणार आहे.
‘फॅमिली स्टार’ चित्रपटाचे दिग्दर्शन परशुराम यांनी केले आहे. विजय-परशुराम यांच्या दिग्दर्शनाखाली ‘गीता गोविंदम’ हा विजय देवरकोंडा याचा चित्रपट सुपरहिट झाला होता. मात्र, यावेळी पुन्हा ती जादू दिसली नाही. ‘फॅमिली स्टार’चा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तब्बल ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता आणि कलेक्शन ३५ कोटींपेक्षा कमी होते.
श्री वेंकटेश्वर क्रिएशन्सच्या बॅनरखाली दिल राजू आणि शिरीष यांनी या ‘फॅमिली स्टार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. विजय आणि मृणाल यांच्याव्यतिरिक्त दिव्यांशा कौशिक, जगपती बाबू, वेनेला किशोर, रवी प्रकाश, राजा चेंबोलू आणि वासुकी आनंद यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे संगीत गोपी सुंदर यांनी दिले आहे.