देशाची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी काही मापदंडावर ट्रेनची चाचणी करण्यात येणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन आज (गुरुवार) BEML च्या फॅसिलिटीमधून रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत दाखल होईल.
वंदे भारत स्लीपर ट्रेनला ICF द्वारे वेगवेगळ्या मापदंडावर चाचणी करण्यापूर्वी ऑसिलेशन ट्रायल केले जाईल. त्यानंतर स्टेबिलिटी ट्रायल, स्पीड ट्रायल आणि अन्य पद्धतीने टेक्निकल ट्रायल्सनंतर प्रवाशांच्या सेवेत आणले जाईल. यासाठी २ महिन्यांचा वेळ लागू शकतो. डिसेंबरपर्यंत ट्रेन धावू शकते. काही दिवसातच या ट्रेनचा ट्रायल रन सुरू होणार आहे.
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण देशातील विविध विभागात ही रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत स्लीपर ट्रेन पहिल्यांदा मुंबई, दिल्ली वा बेंगळुरू या मेट्रो शहरातून सुरू होऊ शकते. याबाबत अंतिम निर्णय लवकरच होऊ शकतो. या ट्रेनच्या फर्स्ट एसी बोगीमध्ये प्रवाशांना गरम पाणी व शॉवरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
वंदे भारत ट्रेनचे तिकीट सामान्य एक्सप्रेसहून अधिक आहे, यामुळे स्लीपर वंदे भारतचे तिकीट दर किती असेल याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या तिकीट दराबाबत आधीच घोषणा केली आहे. त्यानुसार, राजधानी एक्सप्रेसच्या भाड्या इतकेट वंदे भारत स्लीपरचे तिकीट दर असणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच लोको पायलट आणि अटेंडेटसच्या सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या सर्व ट्रेन्स नव्या पद्धतीने डिझाईन केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या ट्रेनमध्ये कवच प्रीफिटेड आहे.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर ट्रेन १६० किमी प्रतितास वेगाने धावेल. जी १८०/ kmph च्या टॉप स्पीडपर्यंत धावू शकते. या ट्रेनमध्ये एकूण १६ कोच असतील, त्यामध्ये ११ ३एसी, ४ २एसी आणि १ प्रथम दर्जा कोच असतील. या ट्रेनमध्ये USB चार्जिंग सुविधासह रीडिंग लाईट, सार्वजनिक उद्घोष, दृश्य स्वरुपात माहिती प्रणाली, इनसाईड डिस्प्ले पॅनल आणि सुरक्षेसाठी कॅमेरे असतील. दिव्यांग यात्रेकरूसाठी विशेष बर्थ आणि शौचालय असतील. या ट्रेनमध्ये अतिरिक्त, फर्स्ट एसी डब्बे असेल. यामध्ये गरम पाण्याच्या शॉवरची सुविधा उपलब्ध असेल.