मराठी मालिका विश्वात सध्या अनेक मालिका चांगल्याच धुमाकूळ घालत आहेत. केवळ मालिकांचं कथानकच नव्हे, तर मालिकेतील कलाकार देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. अभिनेत्री जुई गडकरी, तेजश्री प्रधान, अभिनेता अमित भानुशाली या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली आहे. चला तर बघूया कोणत्या मालिका ‘टॉप ५’मध्ये ट्रेंड करत आहेत…
अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांची ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या या मालिकेत अतिशय रोमँटिक वळण पाहायला मिळत आहे. सायली आणि अर्जुन यांच्यात आता प्रेमळ बंध निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. नवरा बायको म्हणून आता खऱ्या अर्थाने त्यांचा संसार सुरू होणार आहे. या मालिकेने चौदाव्या आठवड्यात देखील आपलं पहिलं स्थान टिकवून ठेवलं आहे.
कला आणि अद्वैत यांची कथा सांगणारी ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती उतरताना दिसत आहे. या मालिकेत आता कला आणि अद्वैत एका प्रकरणाचा मागोवा घेत असताना एकमेकांची मदत करताना दिसत आहेत. हळूहळू या दोघांमध्ये मैत्री देखील निर्माण होत आहे. या मालिकेने टॉप ५मध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
सागर आणि मुक्ताची कथा अर्थात ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या मालिकेने आपलं दुसरे स्थान टिकून ठेवले होते. मात्र, चौदाव्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला टक्कर दिली आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आता वैदहीला आपल्याच बहिणीच्या मृत्यूप्रकरणी कोर्टाच्या तपासाला सामोरे जावे लागणार आहे. वैदेही आणि मंजुळा या जुळ्या बहिणी होत्या, हे सत्य आता समोर आले आहे.वैदहीला आता ती स्वतः निर्दोष असल्याचे देखील सिद्ध करावे लागणार आहे. त्यात स्वरा तिची मदत करणार आहे. या मालिकेच्या रंजक कथानाकामुळे मालिकेने १४व्या आठवड्यात टीआरपी शर्यतीत चौथे स्थान पटकावले आहे.
नव्याने सुरू झालेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत सध्या ऐश्वर्या आणि सौमित्र यांच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हा सोहळा पाहायला मिळणार आहे. सध्या या मालिकेने टीआरपी शर्यतीतलं आपलं पाचवं स्थान टिकवून ठेवलं आहे.