अभिनेता पंकज त्रिपाठी हा रुपेरी पडद्यावर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. प्रत्येक सिनेमात त्याची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून जाते. पंकज त्रिपाठीने सिनेमांमध्ये गंभीर, नकारात्मक भूमिकांसोबतच विनोदी भूमिका सुद्धा केल्या आहेत. त्याने सिनेमांमध्ये वठवलेले कॉमेडी रोल प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पंकज त्रिपाठीचे कॉमेडी सिनेमे पाहण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर खालील सिनेमे तुम्ही पाहू शकता.
लुका-छुपी- हा पंकज त्रिपाठीचा २०१९ साली प्रदर्शित झालेला सिनेमा आहे. या सिनेमात क्रिती सॅनन आणि आर्यन खान मुख्य भूमिकेत आहेत. एक टीव्ही पत्रकार एका हट्टी स्वभावाच्या महिलेसोबत कसा राहतो, याविषयावर ही कथा बेतलेली आहे. दुसरीकडे दोघांच्या, रुढी-परंपरा मानणाऱ्या कुटुंबीयांना वाटतं की या दोघांनी नक्कीच गुपचूप लग्न केलं असावं. यानंतर आपल्या कुटुंबीयांना ते कसं राजी करतात याची ही कहाणी आहे.
‘बरेली की बर्फी’ - २०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘बरेली की बर्फी’ चित्रपटात पंकज त्रिपाठीचा धम्माल, कॉमेडी रोल आहे. सिनेमात आयुष्यमान खुराना, क्रिती सेनॉन, राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमात पंकज त्रिपाठीने अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या वडिलांची भूमिका केली आहे. आपल्या मुलीने कुणाचं न ऐकता आपल्या मनाप्रमाणे काम करावं, असं पिता म्हणून त्याला सतत वाटत असतं.
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'स्त्री' या हॉरर-कॉमेडी सिनेमाचा सिक्वेल असलेला ‘स्त्री-2’ हा सिनेमा २०२४ साली प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागासारखा हाही सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमामध्ये पंकज त्रिपाठीने रुद्रा नावाच्या व्यक्तिची भूमिका वठवली आहे.
फुकरे 3- रिचा चड्ढा, अली जफर, पुलकित सम्राट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘फुकरे-३’ सिनेमामध्ये पंकज त्रिपाठीने पंडित जीचा धमाल कॉमेडी रोल केला आहे. मृगदिप सिंह लांबा दिग्दर्शित हा सिनेमा खूप लोकप्रिय झाला होता.
अमित राय दिग्दर्शित ‘OMG- 2’ या सिनेमात पंकज त्रिपाठीने कांती शरन मुदगलची भूमिका वठवली आहे. मुदगल हा उज्जैन शहरात एक शिवभक्त दुकानदार असतो. अधिक प्रमाणात हस्तमैथुन केल्याने त्याच्या मुलाला रुग्णालयात दाखल करावं लागल्याचं कळताच पापभीरू स्वभावाच्या मुदगलला मोठा धक्का बसतो. त्यात शाळेच्या मूत्रीघरात मुदगलचा मुलगा हस्तमैथुन करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याला शाळेतून काढून टाकलं जातं. त्यामुळे शहर सोडून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मुदगलला एक देवदूत भेटतो. अशी ही कथा आहे.