हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याने रणजी ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. त्याने केरळविरुद्धच्या पहिल्या डावात सर्व १० फलंदाज बाद केले. त्याने ३०.१ षटके टाकली. यामध्ये त्याने ४९ धावा देत सर्व १० फलंदाज बाद झाले.
तब्बल २४ वर्षांनंतर भारतीय गोलंदाजाने प्रथम श्रेणी सामन्याच्या एका डावात सर्व १० विकेट घेतल्या आहेत. २३ वर्षीय कंबोज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० बळी घेणारा तो भारताचा सहावा गोलंदाज आहे. आत्तापर्यंत अशी कामगिरी करणारे ५ गोलंदाज कोणते? ते जाणून घेऊया.
सुभाष गुप्ते - प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका डावात १० विकेट घेणारा सुभाष गुप्ते हा पहिला भारतीय गोलंदाज होता. त्याने डिसेंबर १९५४ मध्ये मुंबईकडून खेळताना पाकिस्तान सर्व्हिसेस आणि बहावलपूर क्रिकेट असोसिएशनविरुद्ध ७८ धावांत १० बळी घेतले.
प्रेमांगसू चटर्जी - प्रेमांगसू चटर्जी बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. रणजी करंडक १९५६/५७ मध्ये त्याने ही कामगिरी केली होती. आसामविरुद्ध जोरहाटमध्ये झालेल्या सामन्यात त्याने १९ षटकात २० धावा देत १० बळी घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.
प्रदीप सुंदरम - वेगवान गोलंदाज प्रदीप सुंदरम राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत असे. त्याने रणजी ट्रॉफीमध्येच विदर्भाविरुद्धच्या डावात सर्व १० विकेट घेतल्या होत्या. १९८५/८६ च्या मोसमात जोधपूर येथे झालेल्या सामन्यात त्याने ७८ धावांवर १० फलंदाज बाद केले होते. प्रदीपही भारताकडून खेळू शकला नाही.
अनिल कुंबळे- कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेणारा अनिल कुंबळे हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. त्याच्याशिवाय जगातील फक्त दोनच गोलंदाजांना ही कामगिरी करता आली आहे. १९९९ मध्ये दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत कुंबळेने ७४ धावांत सर्व १० फलंदाज बाद केले होते.