टी-20 वर्ल्डकप २०२४ जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (२९ जून) भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. तेव्हापासून भारतीय चाहते चॅम्पियन टीम इंडिया ट्रॉफीसह देशात परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता आज म्हणजेच ४ जुलैला सकाळी रोहित शर्माची चॅम्पियन टीम दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली.
चॅम्पियन टीम इंडियाला मायदेशात पोहोचण्यासाठी खूप प्रतिक्षा करावी लागली. भारताच्या विश्वचषक वीरांना मायदेशी पोहोचण्यासाठी ५ दिवस आणि नंतर १६ तासांचा विमानप्रवास लागला.
प्रवास खूपच लांबचा होता, पण भारतीय क्रिकेटपटूंची ऊर्जा जास्त होती. दिल्लीत पोहोचल्यानंतर टीम इंडियाचा डान्स, ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरला .
दिल्लीतील हॉटेलात पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. सूर्यकुमार यादव-रोहित शर्माने डान्स केला.
बेरिल चक्रीवादळामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ, त्यांचे कुटुंबीय, कोचिंग सपोर्ट स्टाफ, बीसीसीआयचे अधिकारी बार्बाडोसमध्ये अडकले होते. दोन दिवसांच्या शटडाऊननंतर विमानतळ कार्यान्वित होताच खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी बीसीसीआयला विशेष चार्टर्ड विमानाची व्यवस्था करावी लागली.
खेळाडूंसोबतच कॅरेबियन बेटांवर अडकलेल्या २० भारतीय क्रीडा पत्रकारांनाही विमानाने मायदेशी आणण्यात आले.
वर्ल्ड चॅम्पियन भारतीय खेळाडूंच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळाबाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. चाहते रोहित कोहलीच्या घोषणा देत होते.
भारतीय खेळाडू दिल्लीत पोहचताच चाहत्यांनी रोहित कोहलीच्या घोषणा दिल्या. चाहत्यांना पाहून भारतीय खेळाडूंमध्येदेखील उत्साह आला.
चाहत्यांना पाहून कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफी उंचावली. रोहितने असे करताच चाहत्यांनी प्रचंड जल्लोष केला आणि इंडिया इंडिया अशा घोषणा दिल्या. यावेळी अंगावर काटा आणणारे क्षण निर्माण झाले होते.