२०२३ सालातील सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी, १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळं सूतक लागण्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही. असं असलं तरी काही काळजी घेतली पाहिजे. ग्रहणाच्या काळात काही गोष्टी करणं अशुभ मानलं जातं. जाणून घेऊया याविषयी...
सूर्यग्रहणाच्या काळात नकारात्मक ऊर्जा वाढत असते. त्यातून नुकसान होऊ शकतं. त्यामुळं ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये.
ग्रहणाच्या काळात देवदेवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नये, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलंय. ग्रहण काळात मंदिर बंद ठेवावं. या काळात मंदिर उघडं ठेवल्यास दु:ख, दारिद्र्य येऊ शकते.
ग्रहणकाळात शुभकार्ये टाळावीत. तसंच, ग्रहणाच्या काळात नवीन कामं सुरू करू नयेत. या काळात नकारात्मक वातावरण असल्यानं अशुभ परिणाम मिळू शकतात, असं मानलं जातं.
ग्रहणकाळात नखे किंवा केस कापू नयेत, केस विंचरू नयेत, असंही म्हणतात. त्यामुळं अशुभ घटना घडू शकतात.
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात गरीब व्यक्तींचा अपमान करू नये. असं केल्यास शनिदेव क्रोधित होऊन तुमच्या जीवनात अशुभ घडू शकते.
ग्रहणाच्या काळात राहू-केतूचा पृथ्वीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळं या काळात अन्न सेवन केल्यानं आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
ग्रहण काळात पूजा करणं निषिद्ध मानलं जातं, परंतु या काळात गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास शुभ फळ मिळतं.
गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यायला हवी. ग्रहणाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवावा. ग्रहण संपल्यानंतर हा नारळ वाहत्या नदीत सोडावा. असं केल्यानं ग्रहणाचा प्रभाव संपतो असं मानलं जातं.