ग्रहणाला धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टिकोनातून फार महत्त्व आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण यंदा २० एप्रिल रोजी झालं होतं. तर, पहिलं चंद्रग्रहण ५ मे रोजी झालं. आता वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण व चंद्रग्रहण होणार आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण ही अशुभ घटना मानली जाते. या काळात अनेक गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. ग्रहण काळात देवळं बंद ठेवली जातात. तर, शुभ कार्ये टाळली जातात.
वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण उद्या, १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी ते सुरू होईल आणि मध्यरात्री २ वाजून २५ मिनिटांनी संपेल.
सूर्यग्रहण राशींवर प्रभाव टाकतं असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण कन्या आणि चित्रा नक्षत्रात होणार आहे. यामुळं या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतात श्रद्धाळू लोक ग्रहणाचा काळ सुतकी मानतात. त्या कालावधीत शुभ गोष्टी पुढं ढकलल्या जातात. मात्र, उद्याचं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळं सुतकाचा संबंध नाही, असं संंबंधित क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे.
१४ ऑक्टोबरचं सूर्यग्रहण भारतात दिसणार नसलं तरी ते जगातील अनेक राष्ट्रांत दिसणार आहे. मेक्सिको, बार्बाडोस, अर्जेंटिना, कॅनडा, कोलंबिया, गयाना, निकाराग्वा, त्रिनिदाद आणि टोबॅगो, क्युबा, पेरू, पराग्वे, उरुग्वे, व्हेनेझुएला, जमायका, हैती, इक्वेडोर, ग्वाटेमाला, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, अरुबा, अँटीगुआ, इथं हे ग्रहण दिसेल. बहामास, बोलिव्हिया, ब्राझील, ग्वाटेमाला आणि अमेरिकी नागरिकांनाही ग्रहणाचा आनंद घेता येईल.