
पक्ष आणि चिन्ह हिरावलं गेल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार मात देणारे शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी मेळावे घेतल्यानंतर आता ते दिल्लीला रवाना झाले आहेत.
दिल्लीत उद्धव ठाकरे हे विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत काँग्रेस हा महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहे. या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीत देशात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी या दोन नेत्यांनी मोदी सरकारवर थेट हल्ले चढवले होते. त्यामुळं दोघांचीही जोरदार चर्चा होती. देशात काँग्रेसनं अनेक ठिकाणी भाजपला धक्के दिले तर, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी वातावरण पालटून टाकले. या दोन्ही नेत्यांचीही दिल्लीत भेट झाली.
दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांच्याशी चर्चाही केली. देशातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याचं समजतं. यावेळी आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात सध्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांचीही उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी ठाकरेंचं स्वागत केलं.



