अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. याचा राग त्याने वेस्ट इंडिजवर काढलेला दिसतो आहे. भारताने डॉमिनिका कसोटी तिसऱ्या दिवशीच एक डाव आणि १४१ धावांनी जिंकली. या सामन्यात अश्विनने दोन्ही डावात मिळून एकूण १२ विकेट घेतल्या. या सामन्यातून त्याने ५ मोठे विक्रम केले आहेत.
भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज
रविचंद्रन अश्विन आता भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तीनही फॉरमॅटमध्ये मिळून अश्विन अण्णाच्या नावावर आता ७०९ बळी झाले आहेत. अश्विनने हरभजन सिंगला (७०७) मागे टाकले आहे. अनिल कुंबळे (९५३) पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतासाठी सर्वाधिकवेळा १० विकेट
वेस्ट इंडिजविरुद्ध अश्विनने आठव्यांदा कसोटीत १० बळी घेण्याचा पराक्रम केला. अश्विनने याबाबतीत अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे. कुंबळेनेही ८ वेळेस कसोटी सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.
वेस्ट इंडिजमध्ये फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी
पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ७ विकेट्स घेत अश्विनने सामन्यात १५६ धावा देत १२ विकेट घेतल्या. याआधी पाकिस्तानच्या सईद अजमल वेस्ट इंडिजमध्ये २०११ मध्ये (११/१११) अशी कामगिरी केली होती.
एका कसोटीत १२ विकेट, मुरलीधरनची बरोबरी
अश्विनने या कसोटी सामन्यात दोन्ही डावांसह एकूण १२ बळी घेतले. त्याने एकाच कसोटीत सहाव्यांदा १२ बळी घेतले आहेत. यासह त्याने मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाची बरोबरी केली आणि श्रीलंकेच्या रंगना हेराथच्या (५ वेळा) पुढे गेला.
भारत-वेस्ट इंडिज संघादरम्यान सर्वाधिकवेळा ५ विकेट
अश्विनने वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत १२ कसोटीत ७२ बळी घेतले आहेत. अश्विनने दोन्ही देशांदरम्यान सर्वाधिक (६ वेळा) ५ विकेट घेण्याच्या महान माल्कम मार्शलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.