
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज बुधवारी सकाळी अचानक हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील छारा गावातील आखाड्याला भेट दिली. राहुल यांनी येथे प्रसिद्ध पैलवान बजरंग पुनियासह उपस्थित कुस्तीपटूंची भेट घेतली.
सध्या भारतीय कुस्तीपटू आणि कुस्ती महासंघ (WFI) यांच्यात वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि कुस्तीपटूंची ही बैठक चर्चेत आली आहे. दरम्यान राहुल यांनी बजरंग पुनियासोबत कुस्ती खेळतानाही दिसले.
राहुल गांधी सकाळीच छारा गावातील 'वीरेंद्र आखाडा' येथे पोहोचले आणि नंतर त्यांनी बजरंग पुनिया आणि इतर कुस्तीपटूंशी काहीवेळ चर्चा केली. सोबतच राहुल गांधी बराचवेळ आखाड्यात होते.
छारा हे पैलवान दीपक पुनियाचं गाव आहे. तर बजरंग पुनियाने याच आखाड्यातून कुस्तीला सुरुवात केली होती. यावेळी कुस्तीपटूंनी सांगितले, की राहुल सकाळी ६ वाजता आखाड्यात पोहोचले होते. त्यांनी पैलवानांच्या दैनंदिन दिनचर्येबाबत जाणून घेतले.


