पुण्यात गुरुवारी झालेल्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तर काही भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगर येथील सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले. पाण्याच्या प्रवाहात नागरिकांचे संसरोपयोगी साहित्य वाहून गेले. आज सकाळी पाऊस ओसारल्यावर नागरिक घरी परतले तेव्हा चित्र विदारक होते.
तब्बल ४०० पेक्षा अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसला. अनेकांच्या किचनमध्ये काहीच राहिलं नाही. धान्य, कपडे सर्व वाहून गेले. रात्री अचानक पाणी घुसल्याने नागरिकांना मध्यरात्री बाहेर पडावे लागले. धरणातून पाणी सोडायच्या आधी प्रशासाने सूचना द्यायला हव्या होत्या. आम्ही सगळ्या वस्तू घरातच ठेवल्या होत्या. आता सगळ पाण्यात वाहून गेले आहे. वॉशिंग मशीन, फ्रिज, मुलांची पुस्तकं सर्व काही वाहून गेलं, असं म्हणत पुरग्रस्त नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.
पुण्यातील सिंहगड रोड भागात एकता नगरी, निंबजनगरी, विठ्ठलवाडी परिसरात खडकवासला धरणातील विसर्गामुळे घरांमध्ये काल पाणी शिरले. अचानक आलेल्या पावसामुळे पार्किंगमधून गाड्या देखील नागरिकांना काढता आल्या नाही. तब्बल पाच ते सहा फुट पाणी या परिसरात साचले.
काल अग्निशामक दल व एनडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्य राबावत तब्बल २७० जणांना बाहेर काढले. आज हे सर्व नागरिक घरी आले. तेव्हा चित्र विदारक होते. घरातील सर्व गोष्टी वाहून गेल्या होत्या.
आम्हाला पाणी सोडण्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नाही खडकवासला धरणातून अचानक पाणी सोडल्याने आमचे हे हाल झाले. त्यामुळे या घटनेला प्रशासनच जबाबदार असल्याचं नागरिकांनी म्हटले आहे.
येथील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंहगड परिसरातील पाणी साचलेल्या भागात पाहणी केली. पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील पाहणी केली.
आज नागरिक आपल्या घरी गेले. त्यांनी घरातील गाळ काढण्यास सुरुवात केली. घरात मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. तर गाड्यांमध्ये पाणी गेल्याने त्यांचे देखील मोठे नुकसान झाले होते.