पुणेकरांच्या लाडक्या मेट्रोचा विस्तार झाला आहे. येरवडा स्थानक कार्यरत झाले असून पुण्यात वनाझ ते रामवाडी पर्यंतचा संपूर्ण विभाग (मार्गिका २) पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे. विद्यार्थी, व्यावसायिक, कर्मचारी वर्ग, येरवडा स्थानकाच्या जवळ असणाऱ्या आयटी हब मधील कर्मचारी आणि रहिवाशांच्या याचा फायदा होणार आहे.
येरवडा स्थानाकांची रचना ऐतिहासिक दांडी यात्रेसारखी केली आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ही एक महत्वाचे आंदोलन होते.
येरवडा मेट्रो स्थानक प्रवासी सेवेत दाखल झाले असून पुणे मेट्रोने दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवा जलद गतीने होण्यासाठी या मार्गावरच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
सकाळी व सायंकाळी पुणे मेट्रोमध्ये जास्त गर्दी असण्याऱ्या वेळेमध्ये सकाळी ८ ते सकाळी ११ व दुपारी ४ ते रात्री ८ दरम्यान, दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्या ७.५ मिनिटांवरून ७ मिनिटे करण्यात आल्या आहेत.
प्रवाश्यांसाठी दर ७ मिनिटाला ट्रेन उपलब्ध होणार आहे. वारंवारिता वाढल्यामुळे दोन्ही मार्गिकांवर ४ फेऱ्यांनी वाढ होणार आहे. या आधी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते जिल्हा न्यायालय या मार्गिकेवर एकूण ११३ फेऱ्या होत होत्या. या फेऱ्या आता ११७ होणार आहेत.
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी म्हंटले आहे, "मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये व वारंवारित्यामध्ये वाढ झाल्याने प्रवाश्याना फायदा होणार आहे. प्रवाश्यांचा मेट्रो स्थानकांवरील विलंबकाळ कमी होणार आहे. गर्दीच्या वेळेत दोन्ही मार्गिकांवर ८ फेऱ्यांची वाढ होऊन जास्त नागरिक मेट्रोतून प्रवास करू शकतील.