राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले असून रविवारी मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देत पुस्तक खरेदी केली.
पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्याचा विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे. विविध निकषांवर मूल्यमापन करून ‘गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकाऱ्यांनी विश्वविक्रम नोंदवला गेल्याची अधिकृत घोषणा करून प्रमाणपत्र प्रदान केले. या प्रदर्शनात विविध पुस्तकांची ६०० दालने लावण्यात आली असून जगभरातील साहित्यातील पुस्तके खरेदी करण्यासाठी पुणेकरांची झुंबड उडाली आहे.
या प्रदर्शनात करण्यात आलेल्या विश्वविक्रमासाठी तब्बल ४,१८९ पुस्तकांचा वापर करण्यात आला. या साठी नीलकंठ प्रकाशन, राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे. या विश्वविक्रमासाठीची तयार करण्यात आलेली कलाकृती ही एक हजार चौरस मीटरची असून सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचा वापर, जागा रिकामी न राहणे, पाच वेगवेगळे रंग असणे अशा विविध निकषांवर हा रेकॉर्ड करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे बूक फेस्टिव्हल कायम राहणार आहे.
महोत्सवादरम्यान भारतीय भाषांमधील पुस्तकांची दालने सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू राहतील, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (एनबीटी) विश्वस्त राजेश पांडे यांनी दिली.
पुणे पुस्तक महोत्सवात यंदा २० ते २२ डिसेंबर या कालावधीत लिट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यात २५ पेक्षा अधिक सत्र विविध विषयांवर होणार आहेत. हे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये होणार असून, ते मोफत राहणार आहेत.
गेल्या वर्षीच्या महोत्सवाने चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले असून यंदा पाच विक्रम मोडण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती महोत्सवाच्या समन्वयक बागेश्री मंथलकर यांनी दिली. 'सरस्वती यंत्र कलाकृतीतील विश्वविक्रमाने महोत्सवाची सुरुवात पुण्याचे पुस्तकांशी असलेले सखोल नाते दर्शविते. राजेश पांडे यांनी सांगितले.
१४ ते २२ डिसेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळ व दुपारच्या सत्रात कथाकथन, चित्रकला, नृत्य, संगीत आणि वैदिक गणित या विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. या कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य आहेत. पुणे चिल्ड्रन फिल्म फेस्टिव्हल १४ ते १८ डिसेंबर दरम्यान दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहे.