कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, खासदार सोनिया गांधी, कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी मे महिन्यात झालेल्या सार्वजनिक निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघाची जागा कायम ठेवत वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.
(PTI)प्रियांका गांधी यांच्या उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्यासोबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस, अलप्पुझा मतदारसंघाचे खासदार के सी वेणुगोपाल उपस्थित होते. प्रियांका गांधी गेले अनेक वर्ष राजकारणात सक्रिया असल्या तरी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी वायनाड शहरात कॉंग्रेस पक्षाची भव्य रॅली काढण्यात आली होती.
प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघामधून आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एका भव्य सभेला संबोधित केलं. वायनाडच्या जनेतेने यापूर्वी राहुल गांधी यांच्याबद्दल जे प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल आभार मानले. या निवडणुकीत मला संधी दिल्यास वायनाडच्या लोकांची मी ऋणी राहिल असं प्रियांका म्हणाल्या. वायनाडमधील या सभेला कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते.
(PTI)उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रियांका गांधी जांभळ्या रंगाची साडी परिधान करून आल्या होत्या. प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचा मुलगाही यावेळी वायनाडमध्ये आले होते. २०१९ साली राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज भरला होता तेव्हापासूनच प्रियांका प्रचारासाठी वायनाडमध्ये येत जात आहेत. वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनं प्रियांका येथील नागरिकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. या पोटनिवडणुकीत भाजपने नव्या हरिदास यांना रिगणात उतरवले आहे.
प्रियांका गांधी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी वायनाड शहरात काढण्यात आलेली भव्य रॅली. ५२ वर्षीय प्रियांका गांधी या गेली ३५ वर्ष कॉंग्रेस पक्षाचं काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मतदारसंघाची जबाबदारी त्या प्रामुुख्याने सांभाळत असत. त्यानंतर २०१७ साली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. परंतु या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता. गेले ३५ वर्ष सक्रिय राजकारणात असलेल्या प्रियांका गांधी यांना वेळोवेळी लोकसभेची निवडणूक लढण्याची विनंती कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र योग्य वेळी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरू असं त्या म्हणाल्या होत्या. वायनाड पोटनिवडणुकीच्या माध्यमातून प्रियांका प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने ही महत्वाची निवडणूक मानली जात आहे.
(PTI)