भारतीय हॉकी संघाचा दिग्गज गोलरक्षक पीआर श्रीजेश याने चांगल्या आठवणींसह खेळाला निरोप दिला. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये स्पेनविरुद्ध खेळलेला कांस्यपदकाचा सामना हा श्रीजेशच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. टीम इंडियाने स्पेनचा २-१ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. श्रीजेशने ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वीच सांगितले होते की या स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे.
पीआर श्रीजेशने २००४ मध्ये ज्युनियर संघासह आपला प्रवास सुरू केला आणि २००६ मध्ये तो वरिष्ठ संघात सामील झाला. ३६ वर्षीय श्रीजेश काही काळ संघात आत बाहेर होत राहिला, परंतु २०११ मध्ये त्याने गोलकीपरची जागा निश्चित केली. तेव्हापासून, श्रीजेशने ४ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे आणि २०२१ मध्ये टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
श्रीजेशने २०१४ आणि २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. २०१६ आणि २०१८ च्या हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही तो असताना भारताला रौप्यपदक मिळाले.
याशिवाय तो टीम इंडियासोबत राष्ट्रकुल स्पर्धेत दोन वेळा पदक विजेताही ठरला आहे. पण त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे २०२० टोकियो ऑलिम्पिक आणि २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्येही त्याने भारताला पदक मिळवून देण्यात मोठे योगदान दिले आहे. सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकल्यानंतर निवृत्त होणे श्रीजेशच्या महानतेला बळ देते.
'द ग्रेट वॉल' - पीआर श्रीजेश हा हॉकी विश्वातील सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ बद्दल बोलायचे झाले तर त्याने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी विरोधी संघाला गोल करण्यापासून रोखले. स्पेनविरुद्धच्या कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनला शेवटच्या ै मिनिटांत ै पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण श्रीजेश दगडासारखा उभा राहिला. या दोनपैकी एकाही वेळी त्याने स्पेनला गोल करू दिला नाही. उत्कृष्ट गोलकीपर असल्याने त्याला हॉकीमध्ये 'द ग्रेट वॉल' म्हणूनही ओळखले जाते.
कांस्य पदक श्रीजेशला समर्पित- सामना संपल्यानंतर श्रीजेशने गोलपोस्टवर बसून आपली ऐतिहासिक आणि चमकदार कारकीर्द साजरी केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने त्याला मैदानात खांद्यावर घेऊन त्याच्याबद्दल आदर दाखवला. दरम्यान, सामना संपल्यानंतर मुलाखतीत मनप्रीत सिंगने सांगितले की, भारताचा कांस्यपदक विजय पीआर श्रीजेशला समर्पित आहे, ज्याने भारतीय हॉकी संघाची दीर्घकाळ सेवा केली आहे.