मायानगरी मुंबई आपल्या झगमगाटाने सर्वांना आकर्षित करते. मुंबई हे अनेक चित्रपट आणि टीव्ही स्टार्सचे घर आहे. ज्या लोकांना टीव्ही मालिका पाहण्याची आवड आहे आणि बॉलिवूड चित्रपटांची क्रेझ आहे आणि ज्यांना चित्रपटांमध्ये दाखवलेल्या ठिकाणांना भेट द्यायची आहे, त्यांनी मुंबईतील या ठिकाणांना नक्कीच भेट द्यायला हवी.
मुंबईच्या गोरेगावमध्ये स्थित मुंबई फिल्मसिटी हे पाहण्यासारखे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे सेट पाहायला मिळतील. अनेक चित्रपटांचे आणि मालिकांचे शूटिंग याच ठिकाणी होते.
मुंबई शहर दाखवताना सर्व चित्रपटांमध्ये गेटवे ऑफ इंडिया देखील नक्कीच दाखवण्यात आला आहे. 'बागी', 'गजनी', 'हिरो नंबर १' आणि 'बॉम्'बे यांसारख्या अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे.
महालक्ष्मीमधील धोबीघाटावर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. 'खेले हम जी जान'पासून ते 'मुन्नाभाई एमबीबीएस'पर्यंत अनेक चित्रपटांचे शूटिंग याच ठिकाणी झाले आहे.
मरीन ड्राइव्ह हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. हा ३.६ किलोमीटर लांबीचा एक कट्टा आहे, जो अरबी समुद्राच्या काठावर बांधला गेला आहे. येथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले असून, अनेक स्टार्स रोज सकाळी इथे फिरायला देखील येतात.
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा प्रसिद्ध चित्रपट सलग २६ वर्षे 'मराठा मंदिर' या ठिकाणी प्रदर्शित केला गेला आहे. जर तुम्ही चित्रपटांचे चाहते असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. हे स्थानक युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. 'रा वन' चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले. याशिवाय अनेक चित्रपटांमध्येही ही स्थानक दाखवण्यात आले आहे.