महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईतील कोस्टल रोडच्या एका लेनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. या सागरी मार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले.
मुंबई कोस्टल रोडचे बांधकाम १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सुरू झाले असून त्याचा अंदाजित खर्च १२,७२१ कोटी रुपये आहे.
मुंबई ते कांदिवली २९ किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल.प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात साडेदहा किलोमीटर लांबीचा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
बेस्ट व एसटी बस वगळून सर्व प्रकारची अवजड वाहने(ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड मालवाहू वाहने, वाहने वाहून नेणारे प्रवासी आणि सर्व मालवाहू वाहने), सर्व प्रकारची दुचाकी, सर्व प्रकारची तीनचाकी, जनावरे ओढलेल्या गाड्या, टांगा व हातगाड्यांना परवानगी नसेल.
सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये ३४ टक्के बचत होईल. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. या प्रकल्पाच्या परिसरात ३२० एकर जमिनीवर भव्य सेंट्रल पार्क बनवण्यात येणार आहे. अशाच प्रकारे २०० एकर जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लावले जातील.