भगतसिंह कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळं महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. राज्यातील अनेक राजकीय पक्ष व संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. कोश्यारी व त्रिवेदींची हकालपट्टी करा, अशी मागणी होत आहे. औरंगाबादमधील कडकडीत बंदमुळं या मागणीला बळ मिळालं आहे.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज औरंगाबाद बंदची हाक दिली होती. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे, असं म्हणत, त्यांनी सर्वांनाच रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाचाही परिणाम झालेला दिसला. जाधव यांनी स्वत: रस्त्यावर उतरून कोश्यारी व भाजपच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.
बंदच्या आवाहनामुळं औरंगाबादमधील सर्व प्रमुख बाजारपेठा बंद होत्या. बंदची पूर्वसूचना असल्यामुळं बाजारपेठांमध्ये अक्षरश: शुकशुकाट होता. शिवरायांच्या अपमानामुळं जनतेच्या मनात असलेला रोष या माध्यमातून प्रकट झाल्याचं बोललं जात आहे.
औरंगाबाद जिल्हा व शहर काँग्रेसनंही औरंगाबादमध्ये आज भगतसिंह कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शनं केली. महाराष्ट्र आणि मराठी विरोधी कोश्यारी यांचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. कॉंग्रेसचे जिल्ह्याध्क्ष तथा माजी आमदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं.
काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात क्रांती चौकात करण्यात आलेल्या आंदोलनात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. महिलांनी यावेळी भगतसिंह कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा निषेध केला. 'राज्यपालांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय… गो बॅक कोश्यारी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.